केंद्र सरकारने येत्या 1 मे 2021 पासून सर्व प्रौढांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली असल्यामुळे राज्य सरकारने लसीचा साठा करण्याची आपली क्षमता, देखरेख आणि पुरवठ्यामध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने बेळगाव सारख्या मोठ्या जिल्ह्याला आपली रसद व्यवस्था दहापटीने वाढवावी लागणार आहे.
केंद्र सरकारने जेंव्हा 60 वर्षे वयोमर्यादा पर्यंतच्या लोकांना कोरोना लस देण्याचे निश्चित केले. त्यावेळी राज्य सरकारने लसीकरणासाठी बेळगाव जिल्ह्यात 4.4 लाखाचे लक्ष निश्चित केले होते.
परंतु आता जर सर्व प्रौढांचे लसीकरण करायचे झाल्यास जिल्हा प्रशासनाला 35 लाख लोकांसाठी लस उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लसीचा हा आकडा खूप मोठा असून हे आत्तापर्यंतचे जिल्ह्यातील सर्वात मोठे लसीकरण ठरू शकणार आहे.
यापूर्वी जिल्ह्यामध्ये पल्स पोलिओचे सर्वात मोठे लसीकरण झाले होते. त्यावेळी जवळपास 16 लाख मुलांना पोलिओ लस देण्यात आली होती. मात्र सध्याचे लसीकरणाचे लक्ष त्याच्या दुप्पट आहे. यासाठी आम्हाला लसीचा साठा, वाहतूक आणि पुरवठा यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या आपल्याकडे संपूर्ण जिल्ह्यात 228 लसीकरण केंद्रे आहेत. यापैकी 200 सरकारी आणि 28 खाजगी केंद्रे आहेत. याचा अर्थ आमच्याकडे दोन ग्रामपंचायतींसाठी एक लसीकरण केंद्र आहे.
परंतु आता जर आम्हाला प्रत्येक प्रौढाचे लसीकरण करावयाचे झाल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 4 लसीकरण केंद्रांची गरज भासणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामपंचायतींमध्ये तात्पुरती लसीकरण केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे मत अन्य एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. यामध्ये शीत साखळीची (कोल्ड चेन) देखभाल हा सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे. जिल्ह्यातील 506 ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायतींना 24 तास वीज पुरवठा नाही. त्यामुळे याठिकाणी लस ठेवणे प्रस्तुत कुचकामी आहे. यासाठी आपल्याला पाॅवर बॅकअप अथवा अन्य पर्यायी व्यवस्था करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान बुधवारी प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिश्वास आणि जिल्हाधिकारी के. हरीशकुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने लसीकरणाची क्षमता वाढविण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. आता या आठवड्यात क्रमाने आणखी कांही बैठका होणार असून त्यामध्ये 1 मेपासून सुरू करण्यात येणाऱ्या बृहत् लसीकरणाच्या तयारीबाबत चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे.