काँग्रेस संपली म्हणणार्यांंनी हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान काँग्रेस नेते माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी दिले. कर्नाटक राज्यात बहुमताचे नव्हे तर मित्रपक्षांचे सरकार आहे.
बेळगाव येथील काँग्रेस भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री आर. व्ही. देशपांडे, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. अंजली निंबाळकर, आ. गणेश हुक्केरी, माजी खा. अनिल लाड, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते. सध्या जगातील सर्वाधिक बेरोजागारी असणारा आपला देश बनला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर आजूबाजूच्या देशामध्ये भारतापेक्षा निम्म्यावर आहेत. हेच मोदींचे ‘अच्छे दिन’ आहेत का? असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस चिल्लर राजकारण करत आहे अशी टीका उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली आहे. यावर प्रत्त्युत्तर देताना एम. बी. पाटील म्हणाले, सध्या सत्तेवर असलेलं सरकार हे बहुमताचे नाही तर मित्रपक्षांचे आहे. ऑपरेशन कमळ करताना त्यांनी काय नीती अवलंबली होती, हे सार्यांनी पाहिले आहे. सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आलेले हे मित्रपक्ष आहेत. त्यांच्यात एकमेकामध्ये पायपोस नाही. ग्रामविकास मंत्र्यानीच आता मुख्यमंत्र्यांविरुध्द तक्रार केली आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, अशीही टीका एम. बी. पाटील यांनी केली.
महापूर आणि अतिवृष्टीच्या मदतीसाठी आलेल्या केंद्र सरकारच्या मदतनिधीत भ्रष्टाचार झाला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न न करता या निधीमध्येच या सरकारने भ्रष्टाचार केला आहे. केंद्र सरकारने तर खोटी आश्वासने देण्याचे कहर केला आहे. सत्तेवर आल्यास शंभर दिवसांत काळा पैसा देशात आणू, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करु, वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देऊन, महागाई पूर्णपणे कमी करु, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारने एकही वचन पाळले नाही, असा आरोप त्यांनी केला.