जारकीहोळी सीडी प्रकरणी संबंधित युवतीने नुकताच आपला जबाब नोंदविला असून हा जबाब रद्द करण्यात यावा, अशी विनंती युवतीच्या वडिलांनी केली आहे.
आपल्या मुलीवर राजकीय नेत्यांनी दबाव टाकला असून या दबावाखाली तिने न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले असल्याचे तिच्या वडिलांनी याचिकेत म्हटले आहे. यानंतर गोकाकमध्ये लखन जारकीहोळी यांनी पुन्हा एक विधान केले असून सदर युवतीच्या पालकांनी थेट डीकेशींवर आरोप केले असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
गोकाकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत, ‘दुश्मन कहा है, दुश्मन अपने बगलमे है’ असा अप्रत्यक्षरीत्या सतीश जारकीहोळीनाही टोला लगावला आहे. यासोबतच सीडी प्रकरणात केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचाही हात असून सर्वप्रथम त्यांनी नैतिक जबादारी स्वीकारावी आणि अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यासंदर्भात काँग्रेस हायकमांडने विचार करावा, असेही ते म्हणाले.
सध्या बेळगाव, मस्की, बसवकल्याण याठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. एकाचवेळी जर राजीनामे दिले तर या निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल, असेही लखन जारकीहोळी म्हणाले.