बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राची आणि स्ट्रॉंग रूमची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी आज केली. शहरातील आरपीडी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी यासह निवडणुकीसंदर्भातील तयारीचाही त्यांनी आढावा घेतला.
निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार स्ट्रॉंग रूम निर्माण करण्यात यावे, असे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रांमधील प्रत्येक खोलीची तपासणी करत निर्धारित वेळेत सर्व तयारी पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
मतमोजणी साठी लागणारी उपकरणे मतमोजणी दिवसापूर्वी सुस्थितीत उपलबध करावीत, यासह सुरक्षा व्यवस्था, परिसरात लावण्यात येणारे बॅरिकेड्स, निवडणुकीसाठी ठरविण्यात आलेल्या खोल्या, प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र केंद्र यासह संपूर्ण व्यवस्था उत्तमरीतीने करण्यात आल्याची खात्री अधिकाऱ्यांनी करून अहवाल देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी संजीव कुमार हुलकायी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम संबंधित माहिती दिली. मतमोजणी केंद्राला भेट देतेवेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अपार जिल्हाधिकारी योगेश्वर एस., उपविभागीय अधिकारी अशोक तेली यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.