बेळगाव जिल्ह्यात व्यापक प्रमाणात कोविड संसर्ग फैलावत असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोविड नियंत्रणासाठी गावपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील कार्यबल आणि गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांनी जबाबदारी हाताळावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
सध्या अनेक ठिकाणी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगार शहरी भागातून ग्रामीण भागात येत आहेत. परप्रांतीय कामगार, महिला कामगार आणि दुर्बल घटकांसाठी जेवण, मास्क आणि सॅनिटायरझरची व्यवस्था करण्यात यावी.
विशेषतः गरजूंसाठी, दिव्यांगांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, देवदासी, तृतीय पंथी या सर्वांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याव्यतिरिक्त, कोविड प्रकरणांमध्ये लसीकरण प्रक्रिया वाढविण्यासाठी आवश्यक ती पाउले उचलली पाहिजेत आणि लसीकरणाच्या दुसर्या डोसनंतर संबंधित व्यक्तीस प्रमाणपत्र दिले पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
कोरोना नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे दूरध्वनी क्रमांक प्रकाशित करावेत, जेणेकरून अत्यावश्यक वेळी आणि आपत्कालीन वेळी गरजूंना मदत मिळू शकेल. ग्रामपंचायतीने हेल्पलाईन क्रमांक प्रकाशित करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
१४ व्या वित्त आयोगातील उर्वरित अनुदानातून ग्रामपंचायतीमार्फत मास्क, सॅनिटायझेशन करण्यासाठी लागणारी सामग्री आणि जेवणाची व्यवस्था करावी. तसेच १५ व्या वित्त आयोगातील अनुदान उपयोगात आणावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिले.