बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा एकंदर रागरंग पाहता भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांवर मात करण्यासाठी जणू बाह्या सरसावल्या आहेत. काँग्रेसने बेळगाव दक्षिण मतदार संघामध्ये मराठीभाषिक मतदारांच्या कलाने घेऊन त्यांची मने जिंकण्याचा आटापिटा सुरू केला आहे. यासाठी काँग्रेसमधील मराठीभाषिक नेतेमंडळी आघाडीवर असल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये बेळगाव दक्षिण मतदार संघातील मराठी भाषिक उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाला आपली मते दिली आहेत. हे लक्षात घेऊन सध्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघातील मराठी भाषिक नेत्यांना आपल्या बाजूने वळवून भाजपची मराठी मते फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या “इम्पोर्ट पॉलिटिक्स”द्वारे मराठी भाषिकांची मते आपल्या झोळीत पाडून घेण्याच्या दृष्टीने काँग्रेसकडून प्रचारावर भर देण्यात येत आहे. बेळगाव दक्षिण संघामध्ये मराठी भाषिक आणि ब्राह्मण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा आणि ब्राह्मण समुदायाच्या नेत्यांना वश करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. यासाठी काँग्रेस नेते अनिल लाड, खानापूरच्या आमदार डॉ अंजली निंबाळकर, श्रीनिवास माने आदी मराठी मंडळींनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिल्याचे पहावयास मिळत आहे.
दरम्यान बेळगाव दक्षिणच्या भाजप आमदारांनी देखील भाजप उमेदवार मंगला अंगडी यांना विजयी करण्याचा चंग बांधला आहे. आपल्या वैयक्तिक संपर्कांचा वापर करण्याबरोबरच प्रचारसभा आदी घेऊन मंगला अंगडी यांना जास्तीत जास्त मते मिळावीत यासाठी ते मोर्चेबांधणी करत आहेत.