बेळगाव महापालिकेचे आयुक्त जगदीश के. एच. यांनी आज स्वतः शहरातील बाजारपेठेत फिरून जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त जी अन्य दुकाने सुरू होती ती सर्व बंद करायला लावली.
तसेच बाजारपेठेत फेसमास्क न घालता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून कोरोना नियंत्रणासाठी सरकारी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.
राज्य सरकारने जीवनावश्यक साहित्याने व्यतिरिक्त अन्य साहित्यांची दुकाने बंद ठेवण्याचा त्याचप्रमाणे कोरोनासंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश बजावला आहे.
त्या अनुषंगाने बेळगाव जिल्हा प्रशासन व महापालिका गेल्या अनेक दिवसांपासून या नियमांची अंमलबजावणी करण्याचा तसेच विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची मोहीम राबवत आहे. आज सकाळी स्वतः महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी आपल्या पथकासह किर्लोस्कर रोड येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांखेरीज सुरू असलेली अन्य दुकाने बंद करायला लावून दुकानदारांना दंड आकारला.
यावेळी परवानगीशिवाय दुकाने चालू केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. दुकाने बंद करण्याबरोबरच आयुक्तांनी रस्त्यावर फेसमास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून दंडात्मक कारवाई करून कोरोना नियंत्रणासाठी सरकारी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.