माजी मंत्री रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणातील युवतीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कडक बंदोबस्तात विजयपूर जिल्ह्यात नेण्यात आले आहे. सदर युवतीचे आई-वडील आणि दोन्ही भाऊ हे कुवेम्पूनगर येथे भाडे तत्वावर रहात होते. या सर्वांना विजयपूर जिल्ह्यातील निडगुंडी पोलिस स्थानकाच्या व्याप्तीती येणाऱ्या त्या युवतीच्या आजीच्या घरी नेण्यात आले आहे.
एसआयटीच्या पथकाने व्हिडीओतील युवतीच्या पालकांना काही दिवसांपूर्वी बेंगळूरात चौकशी झाल्यानंतर बेळगावातील एपीएमसी पोलिस स्थानकाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर एसआयटी पथकाच्या एसीपी परमेश्वर यांच्या नेतृत्वाखालील 16 एसआयटी कर्मचार्यांची टीम बेळगाव शहरातील बॉक्साईट रोडवरील एपीएमसी पोलिस स्थानकात दाखल झाली.
दरम्यान, कडक सुरक्षेत पीडितेच्या कुटूंबाला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याठिकाणी त्यांची चौकशी देखील झाली होती. एपीएमसी पोलिसांनी चौकशीनंतर युवतीच्या पालकांना बेळगाव शहरातील कुवेंपु नगर येथील घरी हलविले. याठिकाणी एएसआय आणि 3 पोलिसांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.
या प्रकरणातील पीडित युवतीचे वडील हे बेळगाव शहरातील कुवेंपु नगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद एपीएमसी पोलीस स्थानकात केली होती.
याप्रकरणी मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी आणि एपीएमसी सीपीआय जावेद मुशापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. त्यानंतर आता सदर प्रकरण एपीएमसी पोलीस ठाण्यातून बेंगलोरच्या आर.सी. नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.