महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना मिळणारा भरघोस पाठिंबा, सोशल साईटवर त्यांच्या नावाचा प्रचार आणि बेळगाववर मराठी भाषिकांची सत्ता येईल याची धास्ती प्रशासनाने घेतली आणि शुभम शेळके यांना मिळालेले निवडणूक चिन्ह बदलण्यासाठी प्रशासनाने नेहमीप्रमाणे दबावतंत्र अवलंबले. परंतु नियम आणि कायद्याची बाजू शुभम शेळके यांनी पटवून दिल्यानंतर त्यांना देण्यात आलेले ‘सिंह’ हे निवडणूक चिन्ह अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे.
निवडणूक रिंगणात उतरलेल्या अंतिम उमेदवारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली असून यामध्ये अधिकृतपणे शुभम शेळके यांच्या नावासमोर सिंह चिन्हावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी सायंकाळी घडलेल्या नाट्यमय प्रकारानंतर चिन्हांवरून काही काळ गोंधळ माजला. शुभम शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व बाबी स्पष्ट केल्यानंतर आज अधिकृतपणे बॅलेट पेपर जाहीर करण्यात आला. या यादीनुसार लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात दहा उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या यादीमध्ये शुभम शेळके यांचे नाव नवव्या स्थानी आहे.
जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये सर्वप्रथम भाजपच्या अधिकृत उमेदवार मंगला अंगडी, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी, तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राष्ट्रीय समितीचे विवेकानंद घंटी, चौथ्या क्रमांकावर हिंदुस्थान जनता पार्टीचे वेंकटेश्वर महास्वामी, पाचव्या क्रमांकावर कर्नाटक कामगार पक्षाचे सुरेश मरलिंगणावर, सहाव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आप्प्पासाहेब कुरणे, सातव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार गौतम कांबळे, आठव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार नागाप्पा कळसन्नवर, नवव्या क्रमांकावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके आणि दहाव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार श्रीकांत पडसलगी यांचा समावेश आहे.
ब्रेकिंग न्यूज-अखेर शुभम शेळके यांना मिळालं सिंह चिन्ह-निवडणूक अधिकारी हरीश कुमार यांनी जाहीर केली निवडणूक चिन्ह-शनिवारी झाला होता गोंधळ रविवारी आला अधिकृत आदेश
https://www.facebook.com/375504746140458/posts/1359883861035870/