बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या काऊंटडाऊन सुरु झाले असून प्रशासनाच्यावतीने आवश्यक तयारी पूर्ण करण्यात येत आहे. शुक्रवारी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतपेट्या व अन्य निवडणूक साहित्य सुपूर्द करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांच्या उपस्थितीत सदर साहित्य कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, मुक्त, निर्भय आणि कोविड पार्श्वभूमीवर सुरक्षित वातावरणात सुरळीतपणे निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहरातील बी. के. मॉडेल हायस्कूल आणि वनिता विद्यालय हायस्कूलच्या मैदानावर निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदार याद्या, मतपेट्या, शाई आदी साहित्य घेऊन निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या ड्युटीवर रुजू होण्यासाठी मार्गस्थ झाले.
निवडणुकीच्या कामकाजासाठी तैनात करण्यात आलेल्या काही महिला अधिकारी यावेळी आपल्या कुटुंबासमवेत आणि काही महिला अधिकारी आपल्या चिमुरड्यांसमवेत देखील दिसून आल्या. प्रशासनाने दिलेले साहित्य घेऊन मतदान केंद्रावर सेवा वाजविण्यासाठी या महिला अधिकाऱ्यांची लगबग सुरु होती.
मतदानाच्या वेळेतील शेवटचा एक तास खास कोरोनाबाधितांना मतदान करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. पाचहून अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी विशेष ‘सीआरपीएफ’ बंदोबस्त तैनात केला आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी ३० बसेसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच मतदान शांततेत पार पाडण्यासाठी चोख व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली आहे.