बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी येत्या रविवार दि. 2 मे 2021 रोजी होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचीसह कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यानुसार उमेदवार आणि एजंटांनी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे.
मतमोजणी केंद्रातील प्रवेशासाठी उमेदवारांना सदर प्रमाणपत्र अथवा कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे एजंट मंडळींना देखील 48 तासांपेक्षा जुने नसलेले आरटी -पीसीआर चांचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे लागणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या आदेशात नमूद आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होण्यापूर्वी आणि मतमोजणी झाल्यानंतर संपूर्ण मतमोजणी केंद्राचे सॅनिटायझेशन करून ते निर्जंतुक केले जावे. सील बंद करण्यात आलेली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे हाताळण्यापूर्वी सॅनीटाईझ केली जावीत. मतमोजणी केंद्रांमध्ये गर्दी टाळावी. एका मतदान केंद्रातील मतमोजणीची व्यवस्था तीन -चार खोल्यांमध्ये विभागून केली जावी. मतमोजणीच्या प्रत्येक खोलीत प्रवेश करणाऱ्याचे थर्मल स्कॅनिंग होणे अनिवार्य आहे. केंद्रातील मत मोजणीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने आपले हात साबणाने स्वच्छ धुऊन सॅनीटाइज केलेले असावेत. सर्वानी फेसमास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.
वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता ताप, सर्दी, खोकला आदी आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश बंदी असणार आहे. उमेदवारांनी मतमोजणीच्या वेळी नेमलेल्या एजंट पैकी कोणी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्याच्या जागी दुसऱ्या निगेटिव्ह अहवाल असणाऱ्या एजंटची नियुक्ती करता येईल. मतमोजणी केंद्रातील प्रत्येक खोलीमध्ये नियुक्त निवडणूक कर्मचाऱ्यांसह एजंट मंडळींनी कोरोना मार्गदर्शक सूचीनुसार सामाजिक अंतर राखणे सक्तीचे असणार आहे. उमेदवार आणि एजंट लोकांसाठी पीपीई कीटची व्यवस्था केली जावी. मतदान केंद्रांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेसमास्क, फेसशील्ड आणि हॅन्ड ग्लोजची व्यवस्था केली जावी. पोस्टल मतमोजणीच्या बाबतीत अधिक खबरदारी घेतली जावी.
कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचीची प्रत मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारासह केंद्रातील प्रत्येक खोल्यांच्या बाहेर तसेच अन्य मोक्याच्या ठिकाणी लावण्यात यावी. मतमोजणी केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारांच्या अफवा ना थारा दिला जाऊ नये तसेच केंद्राबाहेर होणाऱ्या गर्दीवर निर्बंध घातले जावेत. विजयी उमेदवारास समवेत फक्त दोन समर्थकांना परवानगी असणार आहे. कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 आणि भादवि कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक अधिकारी असणाऱ्या जिल्हाधिकारी डाॅ. के. हरीशकुमार यांनी दिला आहे.