बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील झंझावाती प्रचार दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी हिंडलगा, सुळगा, तुरमुरी आणि कुद्रेमनी या गावांमध्ये शुभम शेळके यांचे उस्फुर्त स्वागत करून संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागाचा झंझावाती प्रचार दौरा सुरू केला आहे. आज गुरुवारी सकाळी हिंडलगा (ता. बेळगाव) परिसरात त्यांची प्रचार फेरी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, रामचंद्र कुद्रेमानीकर, युवा समितीचे विनायक पावशे आदींसह हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य, युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी शुभम शेळके यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्याबरोबरच त्यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
हिंडलग्यानंतर सुळगा (ता. बेळगाव) गावामध्ये झालेल्या कॉर्नर सभेप्रसंगी शुभम शेळके यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सभेमध्ये बोलताना अशोक चंद्रु पाटील यांनी सुळगा गावचा संपूर्ण पाठिंबा शुभम शेळके यांना जाहीर केला. यावेळी अशोक यल्लाप्पा पाटील यांच्यासह स्थानिक समिती कार्यकर्त्यांची समयोचित भाषणे झाली. सभेला युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
तुरमुरी (ता. बेळगाव) गावामध्ये उमेदवार शुभम शेळके यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्याद्वारे प्रचार फेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी ता. पं. सदस्य सुरेश राजूकर यांच्या हस्ते शेळके यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीमध्ये युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
कुद्रेमनी (ता. बेळगाव) गावामध्ये ग्रा. पं. अध्यक्षा रेणुका रामू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभा घेण्यात आली. गावातील भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या सभेमध्ये युवा नेते मदन बामणे, शांताराम पाटील, ग्रा. पं. सदस्य व नागेश राजगोळकर यांची समयोचित भाषणे झाली. पिकेपीएस चेअरमन ज्योतिबा बडसकर आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा मधुरा गुरव यांनी आपल्या भाषणात शुभम शेळके यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. उमेदवार शुभम शेळके यांनी गावकऱ्यांचे आशीर्वाद मागताना सद्य परिस्थितीत राष्ट्रीय पक्षापासून दूर राहणे आणि मराठी भाषिकांचा आवाज लोकसभेमध्ये पाठविणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी म. ए. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ईश्वर गुरव, गावडू ताणप्पा पाटील, कल्लाप्पा कागणकर, काशिनाथ गुरव, मल्लाप्पा गुरव, दत्ता कांबळे, राजू राजगोळकर, अर्जुन राजगोळकर आदींसह ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यांच्या निमित्ताने मराठी भाषा व हिंदुत्व प्रेमी असण्याबरोबरच निस्वार्थ, अभ्यासू आणि धडाडीची वृत्ती असणाऱ्या शुभम शेळके यांची लोकप्रियता निदर्शनास येत आहे. विशेष करून युवावर्ग शेळके यांचा मोठ्या प्रमाणात चाहता झाल्याचे दिसून येत आहे. शुभम शेळके यांच्या प्रचार फेऱ्या, सभा आणि बैठकांना सुरुवात झाल्यापासून बेळगाव शहर आणि तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याचे पहावयास मिळत आहे. एकंदर हे सर्व वातावरण पाहता शेळके यांना निवडून देण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे, असे म्हणण्यास वाव आहे.