बेळगाव जिल्ह्यातील आयुष्यमान -आरोग्य कर्नाटक योजनेअंतर्गत नोंदणीकृत खाजगी हॉस्पिटल्समध्ये एकूण 3,925 बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी शेकडा 50 टक्के बेड्स कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले जावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सोमवारी जिल्हास्तरीय तज्ञ सल्लागार समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त सूचना केली. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 3,925 बेड्स उपलब्ध आहेत. कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाला यापैकी 50 टक्के म्हणजे सुमारे 2000 बेड्सची गरज आहे. मात्र आत्तापर्यंत यापैकी फक्त 641 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपचारासाठी सध्या हे बेड्स अपुरे पडत आहेत, शिवाय कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तेंव्हा उर्वरित बेड्स त्वरेने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले जावेत, असे जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची कमतरता नाही. तथापि कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढल्यास आणि ऑक्सिजनची गरज निर्माण झाल्यास त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून ऑक्सिजन एजन्सी आणि संबंधितांना पूर्वकल्पना देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात कोठेही ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याची काळजी घेण्यात आलेली आहे. ऑक्सिजनच्या जास्तीत जास्त पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी स्पष्ट केले.
ऑक्सीजन पुरवठादारांना संपर्क साधून ऑक्सिजन खरेदी करण्याची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे सोपविण्यात आली आहे. या समितीने निपाणी आणि बेळगावातील ऑक्सिजन उत्पादकांना भेटून जास्तीत जास्त ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवावा अशी सूचनाही जिल्हाधिकार्यांनी केली. बेळ्ळारीच्या बल्डोटा कंपनीने देखील ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. एकंदरच सध्या ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्ह्यात कोणतीही अडचण नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बेळगाव शहरातील विविध ठिकाणच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत अंत्यसंस्कारास परवानगी देण्यात आली आहे. हा कालावधी वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली जात असल्याचे बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी यासंदर्भात आपण महापालिका आयुक्तांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ ,असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ हरीशकुमार यांनी दिले.
अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर एस., जिल्हानगर अभिवृद्धि कोशाचे योजना निर्देशक ईश्वर उळ्ळागड्डी, बीम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, बीम्सचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी आणि जिल्हा तज्ञ सल्लागार समितीचे सदस्य बैठकीस उपस्थित होते.