कोविड संक्रमित रुग्णांच्या चाचण्या, गुणवत्ता चाचणी आणि कोविड संदर्भातील इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज अपर जिल्हाधिकारी, नोडल अधिकाऱ्यांनी बीम्स रुग्णालयाला भेट दिली. यावेळी ज्यांना संसर्ग झाला आहे, ज्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यांच्यावर योग्य आणि प्रभावी उपचार करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. कोविड १९ नियंत्रणासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींवर योग्य ते निवारण करून परिणामकारक पाऊल उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आज प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे सहा तास ही बैठक चालली होती. या बैठकीत कोविड नियंत्रण आणि कोविड वर संपर्क उपचार पद्धतीच्या मार्गसूचीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बीम्स आणि एनआयटीएम प्रयोगशाळेमध्ये निरंतरपणे घशातील द्रवाची चाचणी करण्यात येत आहे. या चाचण्या त्वरित आणि गुणवत्तापूर्ण व्हाव्यात तसेच यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना प्रादेशिक आयुक्त अम्लान बिस्वास यांनी दिल्या.
कोरोना संक्रमित असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेण्यात यावेत. आणि या स्वॅब चाचणीचे अहवाल लकवरात लवकर देण्यात यावेत. तसेच इतर ठिकाणाहून आलेल्या प्रवाशांचे पास तपासण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.
खाजगी रुग्णालयात बेड आणि कोविड रुग्णांवर उपचार कारण्यासंदर्भातदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोनाबाधित व्यक्तीवर वेळेवर उपचार करता यावेत यासाठी जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांतील संपूर्ण बेडची माहिती, बेडच्या गरजेनुसार स्वतंत्र सॉफ्टवेअरद्वारे एकत्रित करुन अंमलात आणली पाहिजे, अशी सूचना देण्यात आली. बेड सामायीकरणासाठी पारदर्शकतेच्या आधारे जिल्हा पंचायत सीईओ यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या मार्गसूचीनुसार सीमाप्रदेशात कडक बंदोबस्त आणि निगराणी ठेवण्यात येत आहे. सीमाप्रदेशात येणाऱ्या वाहनांची तपासणी आणि तपासणी प्रक्रियेवर वरिष्ठ अधिकारी निगराणी ठेवून आहेत. सीमाप्रदेशात चेक पोस्ट वर वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत असल्याचे अम्लान बिस्वास यांनी सांगितले. या बैठकीत कॅब, (कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर) अंतर्गत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस खात्यासह पावले उचलण्यास बैठकीत सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार म्हणाले, बीम्समधील कोविड १९ वॉर्ड मध्ये संसर्गित रुग्णांवर योग्य उपचार मिळावे आणि डॉक्टर व कर्मचार्यांच्या कार्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षकांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. कोविड उपचारात कोणत्याही कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. कोविड चाचणीच्या उपचारात कोणतीही गैरसोय, कर्मचार्यांचा अभाव, अनुदानांची कमतरता किंवा अडचणी येऊ नयेत. जर समस्या असतील तर त्या समस्या त्वरित जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याबद्दल सांगण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दर्शन एच.व्ही. जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी आतापर्यंत कोविड संदर्भात उचललेल्या पावलांसंदर्भात माहिती दिली.
आयसीएमआर-एनआयटीएम संचालक डॉ. चट्टोपाध्याय यांनी कोविड -१ विषाणूची वैशिष्ट्ये आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कोणते उपाययोजना केल्या आहेत याची माहिती दिली.
बेळगाव शहराचे उपायुक्त जगदीश के.एच., अशोक थेली, शशिधर बागली, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी, डॉ. एस.व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी डॉ. बाळकृष्ण टुक्कार, आरसीएच डॉ. आय. पी. गडाद, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, सहायक औषध नियामक रघुराम, डॉ. एम. एस. पल्लेद आदी उपस्थित होते.