Sunday, January 5, 2025

/

मतदानाची जय्यत तयारी : प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग होणार

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या उद्या शनिवार दि. 17 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. यासाठी बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांमध्ये एकूण 676 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून 6,300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार केंद्रांवर प्रत्येक मतदाराची थर्मल चांचणी करण्यात येणार असल्यामुळे 676 थर्मल स्क्रीनिंग मशीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी 1 हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रातील मतदारांची विभागणी करून मतदान बूथची संख्या वाढविण्यात आली आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघात 2 लाख 43 हजार 27 मतदार असल्याने या ठिकाणी 336 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव उत्तर मतदार संघात 2 लाख 42 हजार 618 मतदार असल्यामुळे याठिकाणी 340 मतदान केंद्रे असणार आहेत. शहरातील एकूण 676 मतदान केंद्रांमधील मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी पीआरओ, एपीआरओ आणि पीएस अशा पदावर दोन्ही मतदार संघामध्ये मिळून एकूण 6300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर आहे. या अनुषंगाने प्रत्येक मतदाराची थर्मल चांचणी करण्याकरिता 676 थर्मल स्क्रीनिंग मशीन्स घेण्यात आल्या आहेत.

थर्मल चांचणी आणि मतदारांना सॅनिटायझर देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर थर्मल स्क्रीनिंग झाल्यानंतरच मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रात जाता येणार आहे. शहरातील प्रत्येक मतदान केंद्राची स्वच्छता करून सॅनीटायझींग करण्याचे काम महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सर्व केंद्रांचे सॅनीटायझींग करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.