बेळगाव येथील सांबरा विमानतळ दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत असून देशातील एक महत्वाचे एअरपोर्ट म्हणून बेळगाव विमानतळाचे नाव घेतले जात आहे. बेळगाव विमानतळावरून देशांतर्गत अनेक ठिकाणी विमान सेवा सुरु करण्यात आली असून देशांतर्गत प्रवासामध्ये प्रवासी संख्येत बेळगाव विमानतळाच्या देशात १५ वा क्रमांक मिळविला आहे.
फेब्रुवारी महिन्यात बेळगाव विमानतळावरून तब्बल ३४ हजार ९४० प्रवाशांनी प्रवास केला असून विमानांच्या फेरीत देखील बेळगाव आठव्या स्थानी पोहोचले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतु जसजशी परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली, तशी पुन्हा हि विमानसेवा सुरु करण्यात आली. प्रवाशांच्या मनातील भीती आणि विमानतळाच्या कडक नियम आणि अटींमुळे दूरच प्रवास टाळण्यात येत होता. या काळात बेळगाव विमानतळाने मात्र उत्तम कामगिरी केली. बेळगावहून अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आली. आणि या विमानसेवांचा लाभ अनेक प्रवाशांनी घेतला.
देशातील महत्वाच्या शहरांना बेळगावमधून विमानसेवा उपलब्ध असल्याने दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात ३४ हजार ९४० प्रवाशांनी विमान प्रवास केला असून देशांतर्गत विमान प्रवासात रायपूर साठी १ लाख ६० हजार ६७३ प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. यामुळे रायपूरदेशात प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर रांची, जम्मू, डेहराडून, आगरतळा, उदयपूर, भोपाळ, दिब्रुगड, गोरखपूर, लेह, जोधपूर, वडोदरा, प्रयागराज, सिल्चर यानंतर बेळगावचा क्रमांक पंधराव्या स्थानी आहे. ३४ हजारांवर प्रवासी संख्या पोहोचल्याने येत्या काळात बेळगाव इतर शहरांशीही जोडले जाणार आहे.
बेळगाव विमानतळावरून अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आल्यामुळे विमान फेऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात ६६२ विमान फेऱ्या झाल्या असून यामुळे विमान फेऱ्यांमध्ये बेळगावचा क्रमांक आठव्या स्थानी आहे. रायपूरच्या प्रथम क्रमांक असून त्यानंतर जुहू, रांची, डेहराडून, जम्मू, भोपाळ, उदयपूर आणि यानंतर बेळगावचा क्रमांक आहे. बेळगाव विमानतळावर दररोज १३ ते १४ विमानांची ये – जा असते. यामुळे उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व कोकण परिसरातील प्रवासी या विमानतळावरून विमान प्रवास करीत आहेत.