कन्नड संघटनांच्या गुंडांकडून मराठी भाषिकांची दुकाने आस्थापने आणि कार्यालयांवर हल्ले होत आहेत. पोलीस देखील या समाजकंटकांना मदत करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. एकंदर परिस्थिती पाहता प्रशासन जर दुपट्टेपणा -पक्षपातीपणा करत असेल तर एक केंद्रीय पथक बेळगावातील मराठी माणसांसाठी नेमावे अशी विनंती आम्ही पंतप्रधानांकडे करणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिली.
कन्नड संघटनांच्या गुंडांकडून कन्नड सक्तीसाठी मराठी भाषिकांची दुकाने आस्थापने आणि कार्यालयांवर हल्ले होत आहेत. तेंव्हा या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करावी, जर का हे प्रकार असेच सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडू आणि वेळ आल्यास न्यायालयीन लढा देखील देऊ असा इशारा देणारे निवेदन आज शनिवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांना सादर करण्यात आले. सदर निवेदन सादर केल्यानंतर बेळगाव लाइव्हशी बोलताना शुभम शेळके यांनी उपरोक्त माहिती दिली. कन्नड संघटनांच्या गुंडांकडून कन्नड सक्तीसाठी मराठी भाषिकांची दुकाने आस्थापने आणि कार्यालयांवर हल्ले होत आहेत.
कर्नाटक शाॅप्स अॅण्ड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट रूल 24 ए हा असंविधानिक असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. कोणत्याही राज्याचा कायदा घटनेपेक्षा मोठा असू शकत नाही. भारतीय संविधानाच्या 29 आणि आर्टिकल 24 च्या अनुषंगाने कर्नाटक सरकारचा नियम असंविधानिक आहे. संविधानानुसार कोणीही कोणत्याही भाषेची सक्ती करू शकत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. तेंव्हा हे कन्नड समाजकंटक न्यायालयापेक्षा मोठे आहेत का? असा प्रश्न मला प्रशासनाला विचारावासा वाटतो असे शेळके यावेळी म्हणाले.
मराठी भाषिकांमध्ये पोलीस त्या समाजकंटकांना मदत करतात अशी भावना निर्माण झाली आहे. प्रशासन जर असा दुपट्टीपणा -पक्षपातीपणा करत असेल तर एक केंद्रीय पथक बेळगावातील मराठी भाषिकांसाठी नेमावे अशी आमची विनंती आहे. यासाठी पंतप्रधानांची पत्रव्यवहार करण्याचा निर्णय ही आम्ही घेतला आहे. माझे कन्नड संघटनांना आवाहन आहे की त्यांनी जे कांही सुरू केले आहे ते ताबडतोब बंद करावे.
मराठी माणूस कोणत्याही भाषेचा, कोणत्याही राज्याचा अथवा संघटनेचा द्वेष न करता शांततेने रहात आहे. त्याला तुम्ही डिवचणार असाल तर त्याच्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. आम्ही आत्तापर्यंत शांततेत रहात आहोत. गेली 64 वर्षे शांततेच्या मार्गाने घटनेने दिलेल्या अधिकारांसाठी आम्ही लढतो आहोत. त्याच्यावर जर गदा आणत असाल तर आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावे लागेल, असा इशाराही शुभम शेळके यांनी संबंधित कन्नड संघटनांना दिला.
सोशल मीडिया अर्थाचा समाज माध्यमातून प्रक्षोभक विधाने करून द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे. तेंव्हा माझी कन्नड आणि मराठी दोन्ही भाषेच्या लोकांना विनंती आहे की त्यांनी हा प्रकार बंद करावा. लोकांमध्ये 50 टक्के द्वेषाची भावना समाज माध्यमांमुळे निर्माण होत आहे. खुद्द पोलीस आयुक्तांनी देखील हा प्रकार आपण बंद करण्यास सांगा, असे आम्हाला सांगितले आहे, असे शेळके म्हणाले.
पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, जे कन्नड समाजकंटक दुकानदार आणि व्यावसायिकांना त्रास देत आहे. त्यांचे भाषिक अधिकारी हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या समाजकंटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. बेळगावचे वातावरण गढूळ करणाऱ्या संबंधित गुंडांना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करावी. मात्र जर का हे प्रकार असेच सुरू राहिल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू तसेच न्यायालयीन लढा देखील देऊ अशा आशयाचा तपशील नमूद आहे. पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांना निवेदन सादर करतेवेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, समन्वयक अरविंद नागनूरी, रणजीत चव्हाण -पाटील, आर. आय. पाटील आदी उपस्थित होते.