कोल्हापूर स्थित सीलबंद पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्या “ॲक्वन” या स्थानिक कंपनीच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कृमी आढळून आल्याचा संतापजनक प्रकार नुकताच बेळगावात उघडकीस आला.
याबाबतची माहिती अशी की बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका आईस्क्रीमच्या दुकानांमध्ये सीलबंद पिण्याचे पाणी खरेदी करण्यास आलेल्या एका ग्राहकाला “ॲक्वन” प्रीमियम वॉटर या पाण्याच्या बाटलीमध्ये जिवंत कृमी आढळून आला त्याने सदर बाब दुकान चालकाच्या निदर्शनास आणून दिली. तेंव्हा दुकानदाराने तात्काळ “ॲक्वन” या कोल्हापुर येथील कंपनीच्या बेळगावातील वितरकाशी संपर्क साधून तक्रार नोंदविली.
मात्र संबंधित वितरकांनी उद्धट उत्तरे देऊन साधा कृमी आढळला तर एवढे मोठे काय झाले तो काढून टाका आणि पाणी प्या, असा उफराटा संतापजनक सल्ला दिला. कृतीयुक्त पिण्याचे पाणी असलेल्या ॲक्वन प्रीमियम वॉटरच्या बाटलीवर “फ्रेशन अप युवर माईंड” अर्थात तुमचं मन प्रफुल्लित करा, अशी टॅगलाईन छापण्यात आली असून हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.
उष्म्यात कमालीची वाढ होत असल्यामुळे सीलबंद मिनरल वॉटरला वाढती मागणी आहे. या परिस्थितीत वरीलप्रमाणे कृमी युक्त पिण्याचे पाणी आकर्षक सीलबंद बाटलीतून विकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. तरी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोल्हापूरच्या संबंधित कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.