बेळगाव विमानतळाचे सरकारी स्वरूपातून खासगी विमानतळ असे वर्गीकरण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार देशातील दोन आणि तीन क्रमांकाच्या शहरातील विमानतळाच्या विकासासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असे संकेत दिले आहेत. केंद्रीय विमानोड्डाण प्राधिकरणाच्या ताब्यातून घेऊन काही विमानतळ खासगीकरणासाठी देण्याची तयारी याच अनुषंगाने सुरू झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर,सोलापूर,औरंगाबाद,अकोला,जळगांव, गोंदिया,जुहू तसेच जवळच्याच बेळगाव आणि गोवा विमानतळाचे खासगीकरण लवकरच होऊ शकते.
हे काम नेमके केंव्हा होणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण आगामी वर्षभरात याला चालना मिळू शकते. विमानतळ खासगीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात भारत सरकार १० विमानतळाची घोषणा करू शकते. यापूर्वीच्या टप्प्यात अहमदाबाद, जयपूर,मंगळूर, त्रिवेंद्रम आणि गुवाहाटी येथील विमानतळाचा समावेश होता.