कॅम्प परिसरात गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला नसल्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कॅम्प परिसरातील हाय स्ट्रीट, बुचर स्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट चर्च स्ट्रीट आदीसर्व भागांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला आहे. गेल्या कांही दिवसांपासून शहरातील उष्मामध्ये वाढ होत आहे.
यात भर म्हणून सलग सहा दिवस पाणी नसल्यामुळे कॅम्प परिसरातील जनतेचे हाल होत आहेत. या ठिकाणी विहिरी आणि कूपनलिका आहेत. मात्र त्याचे पाणी पिण्यासाठी वापरण्यायोग्य नसल्यामुळे तहानेच्या बाबतीत त्या असून नसल्यासारखे आहेत.
नळांना पाणी येत नसल्यामुळे येथील नागरिकांना बाजारातून पाण्याच्या बाटल्या खरेदी करून आपली तहान भागवावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आज सुरू होईल, उद्या सुरू होईल या आशेवर दिवस कंठत असणाऱ्या कॅम्पवासियांवर बाजारातील पाहण्यासाठी दररोज 70 -80 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
गेल्या कांही दिवसापासून खंडित झालेल्या पाणी पुरवठाबद्दल तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे समजते. पाणी पुरवठा अचानक का बंद करण्यात आला? याचे निश्चित कारण देखील नागरिकांना अद्याप समजू शकलेले नाही.
स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या बाबतीत मूग गिळून गप्प बसले असल्यामुळे नागरिकात नापसंती व्यक्त होत आहे. तरी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कॅम्प परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.