प्रत्येकाच्या बालपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आईस्क्रीम खाल्लेली आठवण ही आमरण असतेच. गल्लोगल्ली हातगाडीतून आपल्या विशिष्ठ शैलीत ओरडून वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या चवीचे आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच. जसजसे जग पुढे सरकत गेले तसतसा हा हातगाडीवर आईस्क्रीम विकण्याचा व्यवसाय मागे सरत गेला.
आज खूप कमी ठिकाणी अशा हातगाडीवर आईस्क्रीम विकून आपला उदरनिर्वाह करणारे व्यावसायिक आहेत. पाच्छापूर येथील निसार अहमद अख्तर नामक एका आईस्क्रीम विक्रेत्या चाचाशी बेळगाव लाईव्ह टीमशी भेट घडली. आणि पुन्हा एकदा बालपणीचा काळ आठवू लागला.
सहसा ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात हे फेरीवाले आईस्क्रीम चाचा दिसून येतात. सध्या उन्हाच्या झाला वाढल्या असून कडक उन्हात थंडगार बर्फाचा गोळा खायला मिळणे म्हणजे सोनेपे सुहागा. शहर आणि उपनगरांमध्ये अनेक कोल्ड्रिंक्स हाऊस आहेत. थिठिकाणी शीतपेयांच्या गाड्या उभ्या असतात. परंतु असे आईस्क्रीमवाले चाचा पाहणे सध्या दुर्मिळ झाले आहे.
निसार अहमद अख्तर यांच्याशी टीम बेळगाव लाइव्हने संवाद साधला असता त्यांनी सध्या सुरु असलेल्या ‘आईस्क्रीम ट्रेंड’ विषयी माहिती दिली. साधारण ५ रुपयांपासून या आईस्क्रीमची किंमत आहे. याशिवाय १० रुपये १५ रुपयांचे आईस्क्रीमदेखील हे चाचा विक्री करतात. हे आइस्क्रीम आझमनगर येथे बनविले जातात.
आझमनगर येथे या आईस्क्रीमची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमधून हे आइस्क्रीम घेऊन गल्लोगल्ली जाऊन या आईस्क्रीमची विक्री हे चाचा करतात. सध्या उन्हाळ्याचा मौसम असून लहान मुलांसह साऱ्यांनाच या आईस्क्रीमचा मोह आवरत नाही, असे ते सांगतात.