सध्या रहदारी पोलिसांकडून शहर आणि उपनगरांमध्ये ठीकठिकाणी थांबून वाहनांची कागदपत्रे तपासणी केली जात आहे. विशेष करुन महाराष्ट्र आणि गोवा पासिंगच्या वाहनांची अडवणूक करून त्यांना लक्ष्य केले जात असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चंदगड भागातून येणाऱ्या वाहनांची आरगन तलावानजीक महात्मा गांधी चौकात सातत्याने अडवणूक करून भरमसाठ दंड वसूल केला जात आहे. दक्षिण आणि उत्तर रहदारी पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांकडून दंड वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शहरात ठिकाणी वाहन तपासणीची मोहीम उघडण्यात आली आहे.
तसेच या ना त्या कारणावरून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सुधारित दंडाची रक्कम जास्त असल्याने वाहनचालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या हेल्मेट नसले तरी 500 रुपये दंड आकारला जातो. त्यात अन्य कारणावरून आणखी एक दोन गुन्हे दाखल केले तर वाहन चालकांना 2 ते 2.5 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
गोव्याकडून शहरात येणारी वाहने गोगटे सर्कल येथे आणि महाराष्ट्रातून येणारी वाहने नेहरूनगर येथे अडविली जातात. त्याचप्रमाणे कोवाड, आजरा, चंदगड भागातून बेळगावकडे येणारी वाहने म. गांधी चौक आरगन तलाव येथे रोखुन कागदपत्र तपासणी करण्यात येते. या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत रोजच तपासणी करण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रातून येणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.