बेळगावमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कन्नड – मराठी वाद मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामुळे बेळगावमध्ये शांततेला तडा जात आहे. शिवाय मराठी माणसांवर दडपशाही होत आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वरिष्ठ नेतेमंडळी बेळगावदौऱ्यावर येत आहेत.
आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे एक दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर आले होते. भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते बेळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा समाजाच्या भाजप मधील काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन बेळगावमध्ये होत असलेल्या मराठी भाषिकांविरोधातील घटनांची माहिती दिली.
मनपासमोर फडकाविण्यात आलेला अनधिकृत लाल – पिवळा ध्वज, त्यानंतर अनेक ठिकाणी भगव्या ध्वजाचा होत असलेला अवमान, आणि बेळगावमध्ये मराठी फलकांवर होत असलेली कारवाई हे प्रमुख मुद्दे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासमोर मांडण्यात आले. भाजपाला पाठिंबा देण्यात येईल, परंतु उपरोक्त मुद्द्यांवर विचार करून मराठी भाषिकांना न्याय मिळावा. अशापद्धतीने मागण्या मांडून सशर्त पाठिंबा देण्यास सहमती दर्शविली.
मराठा विकास प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली. तसेच अनुदान देण्याचेही जाहीर करण्यात आले. परंतु घोषणेनंतर अनुदान देण्यात आले नाही. मराठा समाजासाठी मराठा विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत अनुदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
आज बेळगावदौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी विविध समाजाच्या नेत्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकांमध्ये संबंधित समाजाच्या समस्या आणि मागण्या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.