कन्नड भाषा आणि लाल-पिवळ्या ध्वजाच्या विरोधात प्रक्षोभक विधान करणे, कन्नड कार्यकर्त्यांना धमकावणे आणि भाषिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
कन्नड भाषा आणि लाल-पिवळ्या ध्वजाच्या विरोधात प्रक्षोभक विधान करणे, कन्नड कार्यकर्त्यांना धमकावणे आणि भाषिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपावरून माळमारुती पोलीस ठाणे आणि खडेबाजार पोलीस ठाण्यामध्ये म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
माळ मारुती पोलीस ठाण्यामध्ये बाळू जांडगे या कार्यकर्त्याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून शुभम शेळके यांच्यावर भा.दं.वि. कलम 153, 105 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा यासाठी शेळके यांनी प्रथम न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायालयाने 50 हजार रुपयांचा वैयक्तिक बॉंड आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार, प्रत्येक तारखेला हजेरी, तपासात पोलिस अधिकाऱ्यांना सहकार्य, फिर्यादींना धमकावून नये, पुन्हा असा गुन्हा करणार नाही अशा अटींवर शुभम शेळके यांना जामीन मंजूर केला आहे.
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलिस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम 153 अ, 505 (2), 506 अन्वये शुभम शेळके यांच्यावर दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा यासाठी शेळके यांनी प्रथम न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयाकडे अर्ज केला होता.
न्यायालयाने 25 हजार रुपयांचा वैयक्तिक बॉंड आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार, प्रत्येक तारखेला हजेरी, तपासात पोलिस अधिकाऱ्यांना सहकार्य, फिर्यादींना धमकावून नये, पुन्हा असा गुन्हा करणार नाही आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी अशा अटींवर शुभम शेळके यांना जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने ॲड. नागेश सातेरी, ॲड. महेश बिर्जे आणि ॲड. शंकर पाटील काम पहात आहेत.