सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने प्रशासनाच्या साथीने, कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अत्याचार सुरु केला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात आज लोकसभेत आवाज उठविण्यात आला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत आवाज उठविला.
१२ मार्च रोजी बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ला करण्यात आलेल्या हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी सीमाभागात केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिसांची नियुक्ती करावी तसेच मराठी भाषिकांना संरक्षण पुरविण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली.
कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असूनही कर्नाटक सरक बेळगावच्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कन्नड संघटनांच्या आडून मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यात येत आहे. बेळगाव पोलिसांच्या संरक्षणात सदर प्रकार घडत आहेत. कन्नड संघटनांचा हैदोस सुरु आहे. बेळगावचे पोलीस प्रशासन मराठी भाषिकांना संरक्षण देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
सदर प्रकरणात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता होती. यादरम्यान जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि शहरप्रमुख प्रवीण तेजम यांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केला. यामुळेच पुढील अनर्थ टळला. हा सारा प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरु होता. या घटनेचा निषेध सीमाभागातील संपूर्ण मराठी भाषिक जनता करत आहे. या घटनेत सामील असलेल्या कन्नड संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांच्या डोळ्यादेखत कायदा हाती घेणाऱ्यांना मोकाटपणे सोडून देण्यात आले आहे.
ही सर्व बाब लक्षात घेता बेळगावची शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. याकरिता उपरोक्त मागणी करण्यात आली असून केंद्र सरकारने याचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, अशी विनंती अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. अरविंद सावंत यांनी आवाज उठविताच कर्नाटकातील काही खासदारांनी याला विरोध केला. परंतु शून्य प्रहरात अरविंद सावंत यांनी सीमाभागासंदर्भात आपला मुद्दा मांडला.