बेळगाव महानगरपालिकेसमोर बेकायदेशीररित्या झेंडा फडकविण्यात आला आहे हा झेंडा त्वरित हटविण्यात यावा अन्यथा येत्या शनिवार दि. 20 मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांचे व्यवहार बंद पाडण्यात येतील, असा इशारा कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे यांनी दिला आहे.
कोल्हापूर येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव महापालिकेसमोरील राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा अनाधिकृत लाल -पिवळा झेंडा फडकविण्याबरोबरच बेळगाव शिवसेना कार्यालयासमोर असलेल्या शिवसेना रुग्णवाहिकेवर भ्याड हल्ला करण्यात आला होता.
मराठी भाषिकांची गळचेपी करण्यात येत आहे. त्यांच्यावर कर्नाटक प्रशासन अन्याय करत आहे. आता बेळगाव महापालिकेत समोरील तो ध्वज जोपर्यंत हटविला जात नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. यासाठी येत्या 20 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात उद्योग व्यवसाय करणाऱ्या कन्नड भाषिकांचे व्यवहार शिवसेनेकडून एक दिवसाकरीता बंद पाडले जातील.
कन्नड भाषिक उद्योजक, व्यावसायिक, दुकानदार या सर्वांनी त्या दिवशी आपले व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहन आम्ही करत आहोत. अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांची दुकाने, हॉटेल्स, फाउंड्री व्यवसाय, ठेकेदारीचे काम, ट्रक व्यवसाय, टँकर व्यवसाय, खाजगी बस व्यवसाय तसेच कर्नाटकातून येणाऱ्या एसटी गाड्या बंद पाडल्या जातील, असा इशारा कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेस शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, समन्वयक अरविंद नागनुरी आदींसह बेळगाव आणि कोल्हापूर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.