मंगळवारी कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली असून एका आक्षेपार्ह अश्लील सीडी प्रकरणावरून भाजपात राजकीय भूकंप आला आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंपदा मंत्री, भाजप नेते, बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात अडकलेल्या जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असून पक्ष आणि सरकारला त्रास होऊ नये म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीडी प्रकरणानंतर मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यानंतर जारकीहोळींनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना पत्र पाठवून पक्षाला त्रास होऊ नये म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
बंगलोर येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लहळ्ळी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सर्वत्र पसरली असून हे व्हिडीओ व्हायरल करताना दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून यामध्ये रमेश जारकीहोळी एका तरुणीसोबत दिसून येत आहेत.
कर्नाटक ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये सदर तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कल्लहळ्ळी यांनी केला आहे. यासंदर्भात दिनेश कल्लहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे. संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश यांचे म्हणणे आहे. बंगलोर पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश यांनी केली आहे.
उत्तर कर्नाटकातील एक तरुणी बंगलोरमधील आरटी नगर परिसरातील वसतीगृहात वास्तव्यास आहे. धरणाच्या शॉर्टफिल्म तयार करण्याच्या उद्देशाने तिने पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यासाठी तिला त्यांनी मदतही केली. परंतु, त्यानंतर तिला केपीटीसीएलमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र पुढे नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने जारकीहोळी यांच्यासोबतचे काही व्हिडीओ क्षण रेकॉर्ड केले. बाब समजल्यानंतर जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, व्हायरल झालेले हे व्हिडिओ साधारण महिनाभरापूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे.
रमेश जारकीहोळी यांनी काही काळानंतर त्या युवतीकडे दुर्लक्ष केले. या घटनेचा तरुणीने व्हिडिओ बनविल्याची माहिती जारकीहोळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी या तरुणीसह तिच्या कुटुंबियांना धमकी दिली. सीडी बाहेर पडली तर तुम्हाला सोडणार नाही, अशी भितीही या तरुणीसह कुटुंबाला घातल्याने ती तरुणी व कुटुंबीय समोर आलेले नाही. परंतु आपण समोर येऊन ही माहिती देत आहे, असे दिनेश यांनी सांगितले. रमेश जारकीहोळीचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी त्यांची फसवणूक होत आहे कि, खरोखरच ते या प्रकरणात सामील आहेत याची शहानिशा करण्याची मागणी रमेश जारकीहोळी समर्थकांकडून होत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून या प्रकरणात तथ्य आढळल्यास व आरोप सिद्ध झाल्यास कारवाई करू, असे सांगण्यात येत आहे.