आपण सध्या वरिष्ठांच्या सोबत मार्गक्रमण करत आहोत. आपल्या मतदार संघाच्या विकासात मग्न आहोत. यामुळे कोणाच्या विधानावर प्रत्युत्तर किंवा त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, असा टोला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना लगावला आहे.
रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर या दोघांमधील वाक्युद्ध हे सर्वश्रुत आहे. एकामागोमाग एक असे टीकास्त्र एकमेकांवर हे दोन्ही राजकारणी सोडतच असतात. प्रत्येकवेळी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर एकमेकाला कोपरखळी देतच असतात, आणि यामुळे अनेकांचे राजकीय मनोरंजनदेखील होत असते.
गोकाकमध्ये आज उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोकाक फॉल्स वर सुरु असलेल्या पुलाचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा पत्रकारांसमोर लक्ष्मी हेब्बाळकरांना टोला लगावला आहे. सध्या गोकाक धबधबा परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येत असून, येथे सुरु असलेल्या हायटेक पुलामुळे गोकाकला ‘अमेरिकेचा लूक’ देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, यावेळी म्हादई प्रश्नी न्यायालयीन लढ्याबाबत देखील प्रसारमाध्यमांना माहिती दिली. सध्या म्हादई लवाद न्यायप्रविष्ट असून या महिन्याच्या २५ तारखेला पुढील सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.
यासंदर्भात केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची भेट घेण्यात आली असून पोटनिवडणुकीनंतर यावर निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ म्हादई प्रश्नीच नाही तर जनतेचे प्रत्येक गोष्टीत हित जपणे ही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.