माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या लोकांनी माझ्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, अशी माहिती माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी विशेष तपास पथकाला (एसआयटी) नुकतीच दिली आहे.
माजी मंत्री जारकीहोळी यांनी सोमवारी सदर माहिती एसआय टीला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आपल्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती हे सातत्याने सांगणाऱ्या जारकीहोळी यांचे घनिष्ट मित्र माजी आमदार एम. व्ही. नागराज यांच्याशी ही संबंधित लोकांनी संपर्क साधला होता. खंडणीची रक्कम देण्यास मी नकार दिल्यामुळे माझ्या विरोधात ती अश्लील बनावट सीडी प्रसिद्ध करण्यात आली आहे असेही जारकीहोळी यांनी एसआयटीला सांगितले आहे. सदर अश्लिल सीडी प्रकरणात गुंतवून माझी कारकीर्द संपवण्याचा संबंधित लोकांचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष तपास पथकाचे नेतृत्व करणारे अतिरिक्त पोलीस आयुक्त (बेंगलोर पश्चिम) सौमेंदू मुखर्जी यांनी रमेश जारकीहोळी यांचे विधान व्यवस्थित रेकॉर्ड करून घेण्यात आले असल्याचे सांगून प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्यामुळे त्याबाबतची तपशीलवार माहिती देण्यास नकार दिला. प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी केलेले दावे आणि आरोप यापैकी कांहीच आम्हाला उघड करता येणार नाही, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान एसआयटीने सदर प्रकरणाशी संबंधित तुमकुर येथील एका पत्रकारांच्या पत्नीसह चार जणांची चौकशी सुरू केली आहे. यासाठी पोलिसांचे एक पथक पत्रकाराच्या पत्नीची जबानी घेण्यासाठी सिरा (तुमकुर) येथे रवाना झाले आहे. अश्लिल सीडी प्रकरणात सदर पत्रकार हा मुख्य संशयित असल्याचे मानले जात आहे. तो अन्य तीन संशयित व्यक्तीं समवेत जारकीहोळी यांना खंडणीसाठी ब्लॅकमेल करण्यात सहभागी होता असे सांगण्यात येते.
रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्धचा षडयंत्राचा कट शिजविण्यासाठी संबंधित आरोपी कोणकोणत्या ठिकाणी भेटत होते, याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. त्याप्रमाणे एसआयटीकडून एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधील इलेक्ट्रॉनिक गॅझेट मशीन जप्त करण्यात आले असून जप्त केलेले साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.