राज्याच्या जलसंपदा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आज मंगळवारी पहिल्यांदाच जाहीररित्या पत्रकारांना सामोरे गेले. तसेच माझे धाकटे बंधू भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितल्याप्रमाणे मला बदनाम करण्यासाठी त्या मुलीला 50 लाख नव्हे तर 5 कोटी रुपये देण्यात आले होते असा आरोपही त्यांनी केला.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले होते. अश्लील सीडीद्वारे मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचनाचा कट ओरीऑन मॉल नजीकच्या एका अपार्टमेंटमध्ये तसेच यशवंतपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये शिजला होता, अशी माहिती रमेश जारकीहोळी यांनी दिली. पत्रकारांशी केलेल्या आपल्या अर्ध्या तासाच्या संवादामध्ये जारकीहोळी यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाचा साफ इन्कार करून प्रारंभापासूनच ती सीडी बनावट असल्याचे जे मी सांगत होतो त्या मताशी मी आजदेखील ठाम आहे असे सांगितले. माझ्याविरुद्ध रचण्यात आलेले हे फार मोठे षडयंत्र असले तरी आपण गप्प बसायचे नाही असे मी ठरविले आहे. मला खात्री आहे की सत्य लवकरच बाहेर येईल आणि षडयंत्र रचणारी मंडळी गजाआड होतील, असेही ते म्हणाले.
यावेळी अत्यंत भावनिक होऊन रडण्याच्या बेतात असलेल्या रमेश जारकीहोळी यांनी आपल्यासाठी आपल्या कुटुंबाचा सन्मान सर्वोच्च स्थानी असल्याचे सांगितले. मी षडयंत्र रचनाऱ्यांची नावे सांगू शकत नाही. परंतु ते लोक कोण आहेत हे मला माहित आहे. माझ्या विरुद्धचे षडयंत्र यशवंतपुर पोलीस ठाणे नजीकच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आणि ओरीऑन मॉल नजीक असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर रचण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
जारकीहोळी यांनी देवेगौडा कुटुंबीयांचे विशेष करून एच. डी. कुमारस्वामी आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू एच. डी. रेवण्णा यांचे खास आभार मानले. रमेश जारकीहोळी यांनी राज्यातील मागील सरकार कोसळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी सीडी प्रकरणात कुमारस्वामी व रेवण्णा जारकीहोळी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्याबद्दल मी माझी पत्नी आणि माझ्या कुटुंबाचा देखील आभारी आहे, असेही रमेश जारकीहोळी म्हणाले.
गेल्या चार महिन्यापासून मला या सीडी प्रकरणाची जाणीव करून देण्यात येत होती. भालचंद्र आणि माजी आमदार नागराजू यांनी चार महिन्यांपूर्वी माझ्याकडे येऊन तुझ्या संदर्भातील सीडीबाबत कुजबूज सुरू आहे, तुला काही कल्पना आहे का ? अशी विचारणा केली होती. तेंव्हा मला त्याबद्दल काहीच माहीत नसल्याचे मी सांगितले होते. त्याचप्रमाणे सीडी प्रसिद्धी माध्यमांसमोर येण्यापूर्वी 26 तास आधी भाजपच्या कांही वरिष्ठ नेत्यांनी मला त्याबाबतची कल्पना दिली होती. मात्र कांहीच गैर केलेले नसल्यामुळे मी अजिबात घाबरलो नाही. सीडी प्रसिद्ध झाली त्याच दिवशी माझी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी बैठक झाली. जर कांही चुकीचे केले असते तर मी कशाला म्हैसूरच्या श्री चामुंडी देवीचे दर्शन घ्यायला गेलो असतो? असे रमेश जारकीहोळी म्हणाले. या बिकट काळात मला प्रसिद्धी माध्यमांचा पाठिंबा आणि सहकार्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
“त्या” अश्लिल सीडी मागे एक प्रभावी राजकीय नेता असल्याचे संकेत देताना रमेश जारकीहोळी म्हणाले की, मला जेंव्हा मंत्रिपद देण्यात आले त्यावेळी या नेत्याने रमेश फार काळ आपले खाते सांभाळू शकणार नाही अवघ्या तीन महिन्यात तो मंत्रिपदावरून दूर होईल असे भविष्य वर्तविले होते. परंतु मी समर्थपणे माझे खाते सांभाळले. या माझ्या यशामुळे निराश झालेल्या त्या नेत्याने माझ्याविरुद्ध हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांनी केला.