कर्नाटक -गोवा सीमेवरील पश्चिम घाटात गेली अनेक दशकं नजरेआड दडवून राहिलेल्या पोर्तुगीजकालीन वारसा जपणाऱ्या 135 वर्षापूर्वीचे बांधकाम असलेल्या इमारतीचा नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभाग अधिकाऱ्यांनी शोध लावला आहे. ही दुमजली इमारत पश्चिम घाटाचा भाग असणाऱ्या कॅसलरॉक नजीकच्या ब्रेगंझा घाटात सुप्रसिद्ध दूध सागर धबधब्यापासून अवघ्या अर्धा कि.मी. अंतरावर आहे.
मूळ पोर्तुगीज स्थापत्यशास्त्र असणारी ही इमारत शोधून काढल्यामुळे उत्साहित झालेल्या नैऋत्य रेल्वेने (एसडब्ल्यूआर) या इमारतीचे जतन करण्यासाठी आणि वारसा प्रेमींना गोव्याच्या अद्वितीय भूतकाळाचा पुनर्रशोध घेण्यात सहभागी करून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. सदर दुमजली इमारत वेस्ट ऑफ इंडिया पोर्तुगीज गॅरेंटेड रेल्वे (डब्ल्यूआयपीजीआर) कंपनीने 1885 साली बांधली होती. गोव्यातील मडगांव बंदराच्या उभारणी वेळी डब्ल्यूआयपीजीआरने जो ऐतिहासिक प्रकल्प हाती घेतला होता, ही इमारत त्याचा एक भाग होती. या प्रकल्पाअंतर्गत पोर्तुगीज गोवा आणि ब्रिटिश इंडिया यांना पश्चिम घाट मार्गे जोडणारा 83 कि. मी. अंतराचा रेल्वे मार्ग बनविण्यात आला. यामध्ये दोन वसाहती क्षेत्राधिकारातील दोन विभिन्न कंपन्यांचा सहभाग होता, अशी माहिती संबंधित इमारतीच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेणारे नैऋत्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक पी. के. मिश्रा यांनी दिली.
रेल्वे रुळाच्या मीटर गेजमध्ये सुधारणा करून त्यांचे नव्या रेल्वेमार्गात रूपांतर करण्यात आले, त्यावेळी या मार्गाच्या शेजारी असणार्या बर्याच पोर्तुगीजकालीन वास्तू जमीनदोस्त करण्यात आल्या. अलीकडेच शोध लागलेली ही इमारत इतिहासाची साक्ष देणारी असून पोर्तुगीज काळातील चित्तवेधक स्थापत्याची वैशिष्ट्ये दाखविणारी आहे असे सांगून कर्नाटक -गोवा सीमेवरील गत वारशाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सदर इमारत जतन करणे गरजेचे आहे असे मत मिश्रा यांनी व्यक्त केले.
पश्चिम घाटामध्ये त्या काळात जेंव्हा मीटरगेज रेल्वेमार्ग पहिल्यांदा कार्यान्वित झाला. तेंव्हा या इमारतीचा वापर रेल्वेस्थानक म्हणून केला जात होता. सूत्रांच्या माहितीनुसार इमारतीच्या खालच्या भागातील तीन खोल्यांपैकी एक स्टेशन मास्तरची खोली होती, तर उर्वरित दोन खोल्यांपैकी एक खोली स्नानगृह म्हणून वापरली जायची आणि दुसरी कोठीची खोली (स्टोअर रूम) होती. पहिल्या मजल्यावर बैठकीची खोली, झोपण्याची खोली आणि स्वयंपाकगृह होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आसपासचे विहंगम दृश्य पाहण्याची सोय होती.
मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार लिस्बन येथे 1878 साली भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात रेल्वे मार्ग घालण्यासंदर्भात पोर्तुगाल आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात करार झाला. ड्युक ऑफ सदरलँड यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने भारताला भेट देऊन मडगांव ते कॅसलरॉक दरम्यान रेल्वेमार्ग घालता येईल का? या दृष्टीने पाहणी केली. हे सर्वेक्षण फेब्रुवारी 1880 साली सुरू झाले आणि त्याच वर्षी जुलै महिन्यात पूर्ण झाले. पुढे रेल्वेमार्ग उभारणीच्या प्रकल्पासाठी पोर्तुगीज आणि ब्रिटिश प्रशासनामध्ये करार झाला. त्यानंतर वेस्ट इंडिया पोर्तुगीज रेल्वे कंपनी अस्तित्वात आली.