.. तोंडावर मास्क नाही मग भरा 250 रुपये! : नवा आदेश जारीरोनाची दुसरी लाट आणखी तीव्र होत असल्याने राज्य सरकारने कोरोना संदर्भातील नियम आणखी कठोर केले आहेत. कर्नाटक आरोग्य खात्याच्या सुधारित नव्या आदेशानुसार आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना 250 रुपये दंड आकारला जाणार आहे. बेंगलोर येथे आजपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून विभिन्न अन्य कोविड नियम भंगासाठी 10 हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट आणखी तीव्र होत असल्याने राज्य सरकारने लाॅक डाऊन किंवा नाईट कर्फ्यू जारी करण्याऐवजी सध्या जारी असणारे नियम आणखी कठोर केले आहेत. आरोग्य खात्याने या संबंधीची मार्गदर्शक सूची बुधवारी सायंकाळी जारी केली आहे. या सूचीद्वारे शहरी भागात तोंडावर मास्क न वापरणाऱ्यांना 250 रुपये तर ग्रामीण भागात 100 रुपये दंड आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोविड मार्ग सूचीचे पालन करण्यासंबंधी नेमलेल्या मार्शल व हेडकॉन्स्टेबल्सना दंड वसुलीचा अधिकार देण्यात आला आहे. सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे राज्य सरकारने कोविड तांत्रिक सल्लागार समितीशी चर्चा केली आहे. या समितीने खबरदारीची उपाययोजना हाती घेण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी आदेश जारी केला असून त्यानुसार बेंगलोर वगळता राज्यातील पालिकांच्या कार्यक्षेत्रात मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांना 250 आणि इतर भागात 100 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त विविध पार्ट्या, सभा -समारंभ, विवाह आदी कार्यक्रमांमधील उपस्थितांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. खुल्या जागेवरील विवाह समारंभासाठी 500 आणि बंदिस्त हॉलमध्ये 200 पेक्षा अधिक जणांचा उपस्थितीवर निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 5 हजार रुपये दंड लागू केला जाणार आहे. त्याचप्रमाणे खुल्या जागेतील वाढदिवस कार्यक्रमासाठी कमाल 100 आणि बंदिस्त जागेत 50 पेक्षा कमी जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.