बेळगाव आणि परिसरात स्वतःला कन्नड अभिमानी म्हणून मिरविणाऱ्या मूठभर कन्नड अभिमान्यांचा सतत नंगानाच सुरु असतो. कधी या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात. चार घोषणा…! हातात झेंडा आणि केवळ मर्कटलीला करत फिरणाऱ्या कन्नड कारकर्त्यांनी नावगे धिंगाणा घातला आहे.
बेळगाव – नावगे बसवर असलेली मराठी अक्षरे पुसून टाकण्याचा प्रकार या कन्नड कार्यकर्त्यांनी केला. काही काळ याठिकाणी गोंधळ माजला होता. परंतु त्यानंतर मराठी भाषिकांनी अशा तथाकथित कन्नड कार्यकर्त्यांना ठोस असे प्रत्त्युत्तर देत आपल्या मराठी बाण्याचा हिसका दाखविला.
नावगे गावात सर्व मराठी भाषिकांच्या सहमतीने बसवर मराठी फलक लावण्यात आला होता. परंतु मराठीचा द्वेष उफाळून आलेल्या कन्नड कार्यकर्त्यांनी बसवरील मराठी फलक हटविला. आणि त्याठिकाणी कन्नड फलक लावला. याचवेळी तातडीने अशा कार्यकर्त्यांना हिसका दाखविण्यासाठी मराठी तरुणांनी प्रत्त्युत्तरादाखल कानाडी अक्षरे पुसून टाकली. शिवाय यापुढील काळात असा प्रकार झाल्यास आणि आमच्या भावनांशी खेळ केल्यास योग्य पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही मराठी तरुणांनी दिला.
सीमाभागात सातत्याने असे प्रकार घडत असतात. परंतु अशापद्धतीने कोणतेही कृत्य निदर्शनास आले तर वारंवार केवळ मराठी भाषिक तरुणांना लक्ष्य केले जाते. कन्नड संघटना, कन्नड संघटनांचे कार्यकर्ते आणि तथाकथित नेते राजरोसपणे आणि बिनधास्त पोलिसांच्या देखत असे प्रकार करताना निदर्शनास आले, तरीही प्रशासनासहित पोलीस देखील मूग गिळून गप्प बसतात. संपूर्ण देशात जरी लोकशाही असेल तरी कर्नाटकात आणि पर्यायाने सीमाभागात दडपशाहीचे अस्त्र प्रशासन आणि पोलीस विभाग मराठी भाषिकांसाठी वापरत असते. परंतु मराठी भाषिक जनतेची ताकद अद्याप प्रशासनाला माहित नाही. सध्या सीमाभागात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना चेव चढला आहे.
अशापद्धतीने अनेकवेळा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु मराठी भाषिक जनतेने मनात ठरवलेच तर मात्र पळता भुई थोडी होईल, यात तिळमात्र शंका नाही.