बेळगावच्या प्राणिसंग्रहालयातील तीन आशियाई सिंहांपैकी “नकुल” या सिंहाला सार्वजनिकांच्या दर्शनासाठी उद्यापासून खुल्यावर आणले जाणार आहे. भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधाम प्राणीसंग्रहालयातील कृष्ण आणि निरूपमा या अन्य दोन सिहांना देखील लवकरच खुले सोडले जाणार आहे.
सदर सिहांना संरक्षक काचेच्या भिंती आड ठेवले जाणार असल्यामुळे पर्यटक अगदी जवळून या जंगलाच्या राजाला पाहू शकणार आहेत. बेळगावच्या भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधाम अर्थात प्राणी संग्रहालयामध्ये सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, गवी रेडे आदी प्राण्यांसह विविध पक्षी ठेवण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिली आहे.
सिंहांपाठोपाठ म्हैसूर प्राणी संग्रहालयातून लवकरच वाघ, बिबटे, सांबर, हरणं, तरस हे प्राणी बेळगावला आणले जाणार आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेंगलोरच्या बंनेरुघट्टा जैविक उद्यानातून 3 आशियाई सिंह भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा संग्रहालयामध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
या तीनही सिंहांना आणल्या आणल्या काॅरंटाईन करण्यात आले होते. आता त्यापैकी “नकुल” या सिंहाला सार्वजनिकांच्या दर्शनासाठी उद्यापासून काचेच्या भिंती आड खुल्यावर सोडण्यात येणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वर्गवारीनुसार भुतरामनहट्टी प्राणी संग्रहालय हे लघु प्राणी संग्रहालय (मिनी झू) प्रकारात मोडते.
हे प्राणी संग्रहालय 1989 साली सुरू करण्यात आले, जे 34 हेक्टरमध्ये पसरलेले आहे. सदर प्राणिसंग्रहालय दर मंगळवारी बंद असणार असून आठवड्याचा उर्वरित दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुली असणार आहे.