अंगणवाडी कार्यकर्त्यानी कोरोनाकाळात दिवसरात्र परिश्रम केले आहे. त्यांनी अनेकवेळा विविध गोष्टींसाठी मागण्या केल्या आहेत. परंतु सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांच्यावर अन्याय केला आहे. यासंदर्भात ऍड. नागेश सातेरी यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा हक्क द्या अशी मागणी केली.
सरकारने अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची तरतूद केली नाही. यानिषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी आणि साहाय्यकांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. मागील आठ दिवसांपूर्वी अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पगार, भता यासह विशेष सवलती मिळण्याची मागणी केली होती.
आमदार शशिकला जोल्ले यांनी अंगणवाडी सेविकांना अर्थसंकल्पात विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र आमदारांनीही अंगणवाडी कार्यकर्त्यांची फसवणूक केल्याचे अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखंडितपणे कार्य केलेल्या अंगणवाडी कार्यकत्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. दिवसरात्र काम करणाऱ्या सेविकांना कौतुकाची थाप म्हणून सत्कार करण्यात आला. परंतु यादरम्यान देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत. अर्थसंकल्पात देखील कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नसून, आपण कोणाकडे दाद मागायची असा संतप्त सवाल अंगणवाडी सेविका आणि नागेश सातेरी यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अगणवाडी कर्मचारी वर खूप मोठा अन्याय केला आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थितातून व्यक्त करण्यात आली. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली.