राजकारणात कोण नेता कधी आणि कसे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेईल याचा नेम नाही. प्रत्येक नेत्याचे स्वप्न हे मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याचे असतेच. यासाठी प्रत्येक नेता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो.
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिसणार आहेत. याच अनुषंगाने त्यांनी आपले चारचाकी वाहन देखील २०२३ या क्रमांकाने नोंदणीकृत केले आहे. या वाहनावर चक्क एका वानर महाराजांनी बसून त्यांना आशीर्वाद दिल्याचे छायाचित्र सोशिअल साईटवर व्हायरल होत आहे.
बेळगाव आणि राज्यात पक्ष संघटनेसाठी सतीश जारकीहोळी यांनी कंबर कसली आहे. आपल्या वाहनाचे पूजन त्यांनी स्मशानभूमीत केले होते. याचवेळी आगामी निवडणुकीत बहुमताने विजयी होऊन कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छाही व्यक्त केली. अंधश्रद्धेविरोधात जाऊन जोरदार रणशिंग फुंकणाऱ्या सतीश जारकीहोळी समर्थकांनी मात्र या वानर महाराजांचे वाहनावर बसलेले छायाचित्र व्हायरल केले आहे.
भूतरामनहट्टी प्राणी संग्रहात आज सिंहांचे आगमन झाले. यासाठी प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी आलेल्या सतीश जारकीहोळी यांच्या वाहनावर वानर महाराजांचे आगमन झाले.
दरम्यान यावेळी उपस्थित जारकीहोळी समर्थकांनी कुतूहलाने याचे छायाचित्र घेतले. आणि मुख्यमंत्रीपदासाठी वानर महाराजांनीच आशीर्वाद दिला असल्याची कुजबुज देखील सुरु झाली. सदर छायाचित्र बेळगाव आणि परिसरात कुतूहलाचा विषय ठरले आहे.