कोविड पार्श्वभूमीवर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार, अर्जभरणी आणि यासंदर्भातील कोणत्याही परवानगीसाठी नव्या मार्गसूचीच्या अन्वये परवानगी घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. लोकसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (दि. १७) विविध समित्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजिण्यात आली होती, या बैठकीत ते बोलत होते.
आचारसंहितेचे पालन करण्यात यावे, यासाठी योग्य क्रम घेण्यात यावे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच नजीकच्या नियंत्रण केंद्रात जनतेने तक्रार दाखल करावी, असेही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सुचविले आहे. सर्व सहायक निवडणूक अधिकारी, संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदार क्षेत्रातील मतदार याद्यांसंदर्भातील सर्व कामकाज पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या.
कोविड पार्श्वभूमीवर ८० वर्षांवरील वृद्ध, कोविड संसर्गित रुग्ण, दिव्यांग अशा मतदारांना ब्यालेट पेपर देण्याची सोय निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार करण्यात येईल. बेकायदेशीर मद्य वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची सूचनादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
निवडणूक काळात कोणत्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडल्यास एफएसटी आणि इतर पथकांशी त्वरित संपर्क साधून तक्रार दाखल करावी असा सल्ला पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी यांनी दिला. अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी मस्टरींग, डिमस्टरींग, मतमोजणी यासह सर्व पद्धतीची तयारी आधीपासूनच करण्यात आली आहे, असे सांगितले.
कोगनोळी आणि कणकुंबी या दोन्ही ठिकाणी अबकारी विभागाच्या वतीने चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामाध्यमातून बेकायदेशीर मद्य वाहतूक आणि तस्करी करणाऱ्यांवर करडी नजर आणि कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अबकारी खात्याचे उपायुक्त अरुणकुमार यांनी दिली.
या बैठकीला शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, बेळगाव शहर पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, महानगर पालिका आयुक्त के. जगदीश यांच्यासह विविध समिती नोडल अधिकारी उपस्थित होते.