कणकुंबी येथील म्हादाई प्रकल्पाचे पाणी कणकुंबी येथील कळसा नालामार्गे वळविल्या वरून निर्माण झालेल्या वादा संदर्भात कर्नाटक आणि गोवा राज्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या संयुक्त निरीक्षण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी कणकुंबी येथील प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र यावेळी कर्नाटक पोलिसांनी गोव्याच्या अधिकाऱ्यांना हेतूपुरस्सर अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून महादाई प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी कणकुंबी येथे उपस्थित असलेल्या गोव्याच्या अधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी अरेरावी करत हेतुपुरस्सर अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार काल शुक्रवारी घडला. गोव्याच्या अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढून त्यांची ओळखपत्रे हिसकावण्यात आली. म्हादाई बचाव आंदोलनाचे सचिव राजेंद्र केरकर यांनाही अटकाव करण्याचा प्रयत्न झाला. शेवटी अधिकारी आक्रमक होताच कर्नाटकच्या पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतल्याने वातावरण निवळले.
कळसा नाला मार्गे वळविण्यात येत असलेल्या म्हादाई प्रकल्पाच्या पाण्यासंदर्भात थोडक्यात कणकुंबी येथे कर्नाटकने म्हादाईचे पाणी बेकायदा वळवले आहे, असा आरोप करून गोवा सरकारने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात कर्नाटक आणि गोवा राज्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी संयुक्त निरीक्षण समिती स्थापण्याचा आदेश दिला होता.
या निरीक्षण समितीने शुक्रवारी कणकुंबी येथील प्रकल्प स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. कळसा नाला मार्गे वळविण्यात आलेले म्हादाई प्रकल्पाच्या पाण्यामुळे आदेशाचा भंग होत आहे का? याची शहानिशा करून येत्या चार आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सदर कमिटीला दिला आहे. म्हादाई पाणी प्रकरणाची येत्या 4 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी संयुक्त निरीक्षण समिती आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.