अंगडी कॉलेजकडे जाणाऱ्या नानावाडी रस्त्याशेजारी (हेलिपॅडच्या विरुद्ध बाजूला) मोठ्या प्रमाणात धोकादायक वैद्यकीय कचरा फेकण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत असून याकडे आरोग्य खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
अंगडी कॉलेजकडे जाणाऱ्या नानावाडी रस्त्याशेजारी (हेलिपॅडच्या विरुद्ध बाजूला) मोठ्या प्रमाणात धोकादायक वैद्यकीय कचरा फेकण्यात येत येत आहे. या ठिकाणी उघड्यावर इंजेक्शनच्या सिरिंज, ग्लोज, इंजेक्शन कुप्या, ग्लुकोमीटर स्ट्रिप्स आदी वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात फेकण्यात आला आहे.
पूर्वी सदर रस्त्या शेजारील हा परिसर स्वच्छ असायचा. मात्र अलीकडे या ठिकाणी वरीलप्रमाणे वैद्यकीय कचरा फेकून परिसरात अस्वच्छता निर्माण केली जात आहे. या वैद्यकीय कचऱ्या बरोबरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकाऊ प्लास्टिक तसेच बियर आणि दारूच्या बाटल्यांचा देखील खच पडलेला असतो. सदर ओंगळवाणे दृश्य सकाळी फिरावयास जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीस पडत असल्यामुळे त्यांच्यात तीव्र नापसंती तसेच संताप व्यक्त होत आहे.
सदर वैद्यकीय कचऱ्यामुळे संबंधित ठिकाणचे वातावरण दूषित होत चालले असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी.
सदर परिसर स्वच्छ तर करावाच शिवाय या ठिकाणी हा वैद्यकीय कचरा कोणाकडून फेकला जात आहे याचाही तपास करावा. त्याचप्रमाणे सदर अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सदर रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक तसेच सकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.