रोजगार हमी योजने अंतर्गत जाणून-बुजून काम दिले जात नसल्याबद्दल तसेच ग्रामपंचायतीच्या एका जावयाच्या दादागिरी आणि उद्धट वर्तनामुळे संतप्त महिलांनी एकत्र येऊन तुरमुरी ग्रामपंचायत कार्यालयाला एक नव्हे तर तब्बल 4 कुलपे ठोकल्याची घटना काल मंगळवारी रात्री घडली.
तुरमूरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुरमूरी व बाची गावातील रोजगाराच्या महिलांना वर्षातील 150 दिवस काम न दिल्याने जवळपास 300 पेक्षा जास्त महिलांनी गेल्या कांही दिवसांपूर्वी एकत्र येऊन प्रथमतः ग्रामपंचायतीत आपले मत कायक बंधूंच्या मार्फत मांडले. पण ग्रा. पं. पीडीओ व पंचायतीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सगळ्यांनी तालुका पंचायतीवर धडक मोर्चा काढून वरीष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काम मिळविले.
तथापी या प्रकाराने दुखावलेल्यांनी वेळोवेळी दिलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला, पण गावातील खंबीर महिलांनी त्यांना दाद दिली नाही. अलिकडे परत काम बंद करण्यात आले याची तक्रार पंचायतीला जाऊन कित्येकदा केली. आपल्याला काम का देत नाही? असे पंचायतीत विचारले असता संबंधित कामचुकार पीडीओ थातूरमातूर उत्तरे देत वेळ काढून दिवस घालवत आहे.
यात भर म्हणून ग्रामपंचायतीच्या एका जावयाने आपला कांहीही संबंध नसताना रोजगारला जाणाऱ्या महिलांशी हुज्जत घातली. तेंव्हा महिलांनी आपणास आम्हाला बोलण्याचा काय अधिकार ? असा जाब विचारला असता त्याने महिलांना अर्वाच्च शब्दात उद्धट उत्तरे दिली.
एवढे करून न थांबता त्या जावयाने काल मंगळवारी 23 रोजी महिलांच्या पतीराजांनाही रस्त्यात अडवून त्यांनाही दमदाटी केली. यावर संतप्त झालेल्या महिलांनी एकत्र येऊन काल रात्री पंचायतीला 4 कुलूपं ठोकली आहेत. त्याच प्रमाणे आज बुधवारी दि. 24 मार्च रोजी सकाळी रोजगाराच्या कामावरील सर्व महिलांनी पंचायतीवर मोर्चा काढून संबंधित तुरमूरी ग्रामपंचायतीच्या पीडीओ व जावयावर योग्य ती कारवाई करण्यासाठी धरणे धरण्याचे ठरविले आहे.