राज्याच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये नव्या बेळगाव -कित्तूर -धारवाड रेल्वेमार्गासाठी 463 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्यामुळे दिवांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या सप्टेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने आपल्या 2019 -20 सालच्या अर्थसंकल्पात कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड या 63 कि. मी. अंतराच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला 927.40 कोटी रुपये मंजूर केली असल्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन राज्य सरकारने मोफत देऊ केल्याचे मान्य केले आहे. तसेच या प्रकल्पासाठी येणारा खर्च भारतीय रेल्वे आणि राज्य सरकारने अर्धा अर्धा उचलण्याचे ठरले आहे.
सदर रेल्वेमार्गासाठी आवश्यक असणारी 335 हेक्टर जमिनी आपल्या ताब्यात मिळावी यासाठी नैऋत्य रेल्वेने यापूर्वीच बेळगाव आणि धारवाड जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव धाडला आहे. त्याचप्रमाणे रेल्वेमार्गसंदर्भातील आवश्यक निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकदा का या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले की ते दोन वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. सदर रेल्वेमार्गाचा आपला अभिनव विचार प्रत्यक्ष आणण्यासाठी अंगडी अत्यंत उत्सुक होते. त्याचप्रमाणे मध्यम आणि बृहत उद्योग मंत्री जगदीश शेट्टर हे देखील या नियोजित रेल्वे मार्गादरम्यान औद्योगिक वसाहत निर्माण करण्यास उत्सुक होते.
सध्या अस्तित्वात असलेल्या बेळगाव -धारवाड दरम्यानच्या रेल्वे मार्गापेक्षा हा नवीन रेल्वे मार्ग कमी अंतराचा असणार आहे. सद्यपरिस्थितीत लोंढा मार्गे बेळगाव होऊन धारवाडला जाण्यासाठी 139 कि. मी. अंतराचा प्रवास करावा लागतो आणि यासाठी 3 तास लागतात. परंतु कित्तूर मार्गे निर्माण केला जाणारा नवा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास प्रवासाचे अंतर 31 किलोमीटरने कमी होणार असून जवळपास एक -दीड तासात बेळगावहून धारवाडला पोचता येणार आहे. याचा फायदा प्रवाशांबरोबरच या रेल्वे मार्गावरील तीन प्रमुख शहरातील मालवाहतूकिला होणार आहे. नवा रेल्वेमार्ग कित्तूर, एम. के. हुबळी आणि बागेवाडी या प्रमुख गावांना जोडला जाणार आहे हे विशेष होय.