बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मूळचे खानापूर आणि सध्या टिळकवाडी येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते के. पी. पाटील यांनी बेळगाव जिल्हा शिवसेनेकडे उमेदवारी मिळण्यासाठी मागणी केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक असल्याचा अर्ज सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्याकडे केला आहे.
सीमाभागात मराठी भाषिक जनतेवर सातत्याने होणार अन्याय आणि अत्याचाराला रोखण्यासाठी मराठी जनतेला कोणीही कैवारी नाही.
निवडणुकीपुरते मराठी जनतेला वापरून घेणारे अनेकजण आहेत. परंतु त्यांच्या समस्या आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे असे नेतृत्व नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या तत्वानुसार आपण कार्य करून जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले आहे.
खानापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. सध्या बेळगाव शहरातील टिळकवाडी येथे ते वास्तव्यास आहेत. अनगोळ येथे त्यांचे स्वतंत्र कार्यालय आहे. गेली ८ वर्षे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन के. पी. पाटील यांच्यामार्फत करण्यात येते.
त्याचप्रमाणे आर्थिक अडचणीत असलेल्या गरिबांना मदतीचा हात, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य, वयोवृद्धांच्या मदतीसाठी सतत प्रयत्नशील असणारे के. पी. पाटील यांनी बेळगाव शिवसेनेकडे उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे.