महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, पंजाब आणि इतर अनेक राज्यांमध्ये कोविड रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
खाजगी वाहतूकीच्या माध्यमातून कर्नाटकात येणाऱ्या लोकांना आता त्यांचा कोरोना निगेटिव्ह असलेला अहवाल सादर करावा लागणार आहे. कर्नाटकात प्रवेश घेणाऱ्या परराज्यातील नागरिकांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असल्याची माहिती आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी दिली आहे. या अहवालाशिवाय नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. चाचण्यांची आणि लसीकरणाची संख्या वाढवण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सीमाभागात काटेकोर तपासणी करण्याची सूचना अधिकार्यांना दिली आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा विस्फोट झाला आहे. कोविड तांत्रिक समितीच्या अंदाजानुसार पुन्हा कोरोनाची लाट येण्याच्या मार्गावर आहे. सीमेवर तपासणी केंद्रे सुरु करुन कोरोना निगेटिव्ह अहवाल असेल तरच कर्नाटकात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
गेल्या सहा दिवसांपासून राज्यात हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. आगामी काळात कोरोना मार्गसूचीचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. अन्यथा मोठे संकट येऊ शकते. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
सभा, समारंभ, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम, विवाह समारंभात गर्दी होते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यावर नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. शाळा, कॉलेज, हॉस्टेल विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालल्याचे निदर्शनास आले असून शाळा, कॉलेज, हॉस्टेल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले. जनतेने नियमांचे सक्तीने पालन करावे, असे आवाहन केले.