बेळगाव शहरातील कपिलेश्वर रोड परिसरातील एक अल्पवयीन मुलगा शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास (20 मार्च) बेपत्ता झाला होता. सदर बालकाचा मृतदेह कपिलेश्वर तलावात आढळून आला आहे.
स्वराज राजू मोरे (वय 7) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याचा शोध बराच वेळ घेण्यात आला. त्यानंतर तो शेवटचा कपिलेश्वर मंदिराबाजूच्या कपिलतीर्थ तलाव परिसरात खेळत असल्याची माहिती होती. सदर बालकाचा शोध घेण्यात आला असता, कपिलतीर्थ तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (21 मार्च) सकाळी उघडकीस आली.
तलावात बुडाल्याचा अंदाज आल्याने शनिवारी राञीपासून त्याचा शोध घेण्यात होत होता. मात्र रविवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. या बालकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
स्वराज्य हा आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा होता. बेळगाव महानगरपालिकेने या तलाव परिसरात सुरक्षा व्यवस्था करावी आणि वाहनांचे पार्किंग तसेच बालकांना खेळण्यावर निर्बंध लावावे अशी मागणी होत आहे.
तसेच दरवर्षी गणेश विसर्जनानंतर आणि ईतरवेळी या तलावातील पाणी आणि गाळ काढण्याची मागणी होत आहे. तलावात पाणी आणि गाळ राहल्याने त्या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.