बेळगाव महानगरपालिकेसमोर मूठभर कन्नड म्होरक्यांनी उभारलेला बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज हटविण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी 8 मार्च रोजी सकाळी 11 वा. काढण्यात येणार या मोर्चामध्ये मराठी भाषिकांचासह सर्वांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने एका पत्रकाद्वारे केले आहे.
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी मूठभर कन्नड म्होरक्यांनी बेळगाव महानगरपालिकेसमोर बेकायदेशीर लाल -पिवळा ध्वज उभारला आहे. यामुळे सीमा भागातून संतापाची लाट उसळली आहे. हा लाल -पिवळा ध्वज हटविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 8 मार्च रोजी सकाळी 11 वा. धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाणार आहे. अत्यंत संयम आणि शांततेने हा मोर्चा काढावयाचा असून मोर्चामध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवा कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजीराव हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सरचिटणीस एल. आय. पाटील, एस. एल. चौगुले, संतोष मंडलिक, जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, माधुरी हेगडे आदींनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
मोर्चा यशस्वी करण्याचा येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या 8 मार्च रोजी बेळगावात आयोजित केलेल्या मोर्चात बहुसंख्येने सहभागी होऊन बेळगाव महापालिकेसमोरील बेकायदेशीर लाल-पिवळ्या ध्वजाला तीव्र विरोध दर्शवावा असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी झालेल्या बैठकीत उपरोक्त आवाहन करण्यात आले आहे. बैठकीच्या प्रारंभी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी सर्वांचे स्वागत करून नियोजित मोर्चासंबंधी माहिती दिली. यावेळी बेळगाव येथील मोर्चात बहुसंख्येने सहभागी होऊन तो यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीस कार्याध्यक्ष दूद्दाप्पा बागेवाडी, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, ता. पं. सदस्य रावजी पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, उदय जाधव, विलास घाडी, एल. आय. पाटील, ग्रा. पं. उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, ज्योतिबा चौगुले, महेश कानशीडे, किरण धामणेकर, मारुती धामणेकर, वाय. सी. इंगळे, परशराम घाडी, शिवाजी गोरल, शिवाजी पाटील, शिवाजी सायनेकर, अजित पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपाध्यक्ष राजू पावले यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.