कडोली ते अलतगा रस्त्याची वाताहत झाली असून या ठिकाणाहून जाताना मोठे त्रास सहन करावे लागत आहेत. दरम्यान या रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता खराब झाला आहे तर संबंधित क्वारी चालकांनी हे रस्ते दुरुस्त करून द्यावेत अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. कडोली ते अलतगा हा रस्ता अत्यंत खड्डेमय बनला असून यावरून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आतापर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक झाल्याने हा रस्ता खराब होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. हा रस्ता कडोली आणि अलतगा ग्रामस्थांसाठी एक चांगला दुवा होता.
मात्र अवजड वाहतूक सुरू असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. हा रस्ता असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. मागील दोन ते तीन वर्षापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना हा एक सोयीचा मार्ग बनला होता. मात्र अवजड वाहतूक रस्त्यावरून करण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आणि रस्ता खराब झाला आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत.
त्यामुळे छोटे-मोठे अपघात वाढत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यातील खडी बाहेर येऊन ती अनेकांना त्रासदायक ठरू लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गावरून शेतकऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
मात्र रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता पुन्हा एकदा दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.