बेळगावातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी ज्योती कोरी यांनी बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य मास्टर्स गेम्स 2020 -21 मधील जलतरण प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे.
मास्टर्स गेम्स असोसिएशन कर्नाटकतर्फे गेल्या 13 आणि 14 मार्च रोजी दुसऱ्या कर्नाटक राज्य मास्टर्स गेम्स 2020 -21 चे आयोजन केले होते. या मास्टर्स गेम्समधील डीक्यूब स्पोर्ट्स क्लब बेंगलोर येथे झालेल्या जलतरण स्पर्धांमध्ये बेळगावच्या ज्योती कोरी यांनी महिलांच्या 100 मी. फ्रीस्टाइल, 100 मी. बॅकस्ट्रोक आणि 50 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक हस्तगत केले.
मास्टर्स गेम्स असोसिएशन कर्नाटकचे सेक्रेटरी नटराज आणि ज्येष्ठ प्रशिक्षक लोकराज यांच्या हस्ते कोरी यांना सन्मानित करण्यात आले.
ज्योती कोरी या आरोग्य खात्याच्या कर्मचारी असून त्या कडोली (ता. बेळगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावत आहेत.
राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये अशा पद्धतीने घवघवीत यश संपादन केल्यामुळे ज्योती कोरी यांची आता हैदराबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मास्टर्स गेम्ससाठी कर्नाटक चमूमध्ये निवड झाली आहे. सदर यशाबद्दल ज्योती कोरी यांचे आरोग्य खात्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.