शहरातील डिव्हाईन मर्सी स्कूल या इंग्रजी शाळेमध्ये धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यास बंदी घालणे, कपाळाला शेंदूर लावण्यास बंदी घालणे आदी प्रकार यापूर्वी घडले नाही आणि यापुढे देखील घडणार नाहीत असे मुख्याध्यापक प्रकाराने स्पष्ट केले आहे तेव्हा सदर शाळेच्या बाबतीत विनाकारण गैरसमज पसरविला जाऊ नये, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
डिव्हाईन मर्सी स्कूल या इंग्रजी शाळेमध्ये ध. संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यास बंदी घालणे, कपाळाला शेंदूर लावण्यास बंदी घालणे आदी प्रकार घडत असल्याचा आरोप करणारा एक व्हिडीओ काल मंगळवारी व्हायरल झाला होता. यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी आपल्या मोजक्या सहकार्यांसह आज सकाळी डिव्हाईन मर्सी स्कूलच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. तेंव्हा सर्व जाती -धर्माच्या मुलांसाठी ही शाळा खुली असून याठिकाणी मुलांच्या धर्म संस्कृती अथवा परंपरेवर कोणत्याही प्रकारे गदा आणली जात नाही हे त्यांच्या निदर्शनास आले.
मुख्याध्यापकांशी झालेल्या चर्चेअंती कोंडुसकर यांनी वरील प्रमाणे आवाहन केले. मुलांनी आपला जाती-धर्म, संस्कृती आणि परंपरेशी निगडीत राहणे अत्यंत गरजेचे असले तरी त्यांनी सर्वात प्रथम अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जाती धर्म अथवा संस्कृतीच्या बाबतीत या शाळेत कोणतीही सक्ती केली जात नाही. तेंव्हा विनाकारण अफवा पसरून गैरसमज निर्माण केले जाऊ नयेत.
तसेच एखाद्या संघटनेला शाळेबाबत कांही आक्षेप असल्यास संबंधितांनी मोठ्या संख्येने शाळेत येऊ नये. कारण त्यामुळे शाळेतील मुलांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जे काही आक्षेपार्ह वाटत असेल याबाबत संबंधितांनी मुख्याध्यापकांची भेट घेऊन सामोपचाराने प्रश्न निकालात काढावा, असेही रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत श्रीराम सेना हिंदुस्तानचे अन्य मोजके पदाधिकारी उपस्थित होते.