भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने पॅरा टेबल टेनिस प्रमोशन असोसिएशन इंदोर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या दिव्यांगांच्या राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावसह कर्नाटकच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
इंदोर (उत्तर प्रदेश) येथील अभय प्रशाळा येथे गेल्या 19 ते 22 मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशातील 22 राज्यातील 183 दिव्यांग खेळाडूंनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत भाग घेतलेल्या कर्नाटकच्या 18 खेळाडूंपैकी बेळगावच्या कु. ललिता गवस हिने चौथ्या गटात कांस्य पदक मिळविले.
उपांत्य सामन्यात तिला प्रतिस्पर्धी गुजरातच्या सोनल पटेल हिच्याकडून 3 -0 सेट्सनी पराभव पत्करावा लागला. त्याचप्रमाणे कु. मायव्वा (बेळगाव) हिला देखील कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या स्फूर्ती हिने मायव्वाला 3 -0 असे पराजित केले.
पुरुष गटात गतविजेता बेळगावच्या संजीव हमन्नावर यांनी आपले विजेतेपद यंदाही अबाधित राखताना सातव्या गटात दिल्लीच्या रमेश याला 3 -0 सेट्सनी नमविले स्पर्धेच्या आठव्या गटात बेंगलोरच्या अजय याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात अजयला उत्तरप्रदेशच्या कुणाल आरोरा यांच्याकडून 3 -2 असा पराभव पत्करावा लागला. याच गटात हासनच्या हर्षवर्धन याने कांस्य पदक मिळविले. स्पर्धेच्या नवव्या गटात म्हैसूरच्या श्रीनिवास याने कांस्यपदक हस्तगत केले.
सदर भव्य राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत यंदा प्रथमच बेळगावचे 10 खेळाडू सहभागी झाले होते. या सर्व खेळाडूंना जे. बी. स्पोर्ट्स फाउंडेशन बेळगावचे संतोष जोशी यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
तसेच या सर्वांना गिरीश राठोड गोकाक, सी. ए. असोसिएशन बेळगाव, महांतेश इंचल, विजयकुमार मोहनलाल, व्ही. के. हुक्केरी, संजीव कित्तूर, नटराज पाटील, सदाशिव हिरेमठ, राजू गुरव, शशिधर मट्टीगार (युएसए), सी. बी. जडार (केपीटीसीएल) आदींचे प्रोत्साहन आणि विजयकुमार शिंत्रे व पार्वतीदेवी एम. शिंत्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.