रमेश जारकीहोळी यांच्यासंदर्भात सीडी प्रकरण वेगळ्या वळणावर आले असून सतत प्रसारित होणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडीओ नंतर बसवराज बोम्मई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी पथकाकडे सोपविण्यात आली असून एसआयटी पथक कोणत्याही पक्षाच्या बाजूने नसल्याचे बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
सदर प्रकरणातील ऑडिओ, व्हिडीओ, दोन्ही पक्ष या सगळ्याची कायदेशीर पद्धतीने चौकशी केली जाईल. एसआयटी पथक कोणाच्याही बाजूने काम करत नाही. न्याय मिळवून देण्यासाठी आणि सत्य-सत्यता पडताळण्यासाठी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून, तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.
बंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना बोम्मई यांनी हि माहिती दिली असून या प्रकरणाशी संबंधित कोणीही एसआयटी चौकशीला टाळू शकत नसल्याचे सांगितले. एसआयटी तपास पथक कोणत्याही दबावाशिवाय काम करते. शिवाय कायद्याला अनुसरून प्रत्येक पाऊल उचलून कारवाई करते. यासाठी कोणीही विरोध करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाशी संबंधित अनेक ऑडिओ आणि व्हिडीओ प्रसारित होत आहेत, यासंदर्भात त्यांनी सर्व गोष्टींची पडताळणी होईल, त्यातील सत्यता आणि सर्व पैलीदेखील पडताळले जातील, असे स्पष्ट केले.